ठाणे : भटवाडीतील पोलिसांच्या लाठीचार्जची चौकशी करा : शिंदे गटाचे पोलीस आयुक्तांना पत्र

ठाणे : भटवाडीतील पोलिसांच्या लाठीचार्जची चौकशी करा : शिंदे गटाचे पोलीस आयुक्तांना पत्र

ठाणे: पुढारी वृत्तसेवा : ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भटवाडी परिसरात सोमवारी (दि.१४) शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या समर्थकांमध्ये राडा झाला. यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. जमावावर झालेल्या या लाठीचार्जची चौकशी करण्याची मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने केली आहे. यासंदर्भात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्याकडे चौकशी करण्याचे पत्र दिले आहे.

घटनास्थळी खा. राजन विचारे, संजय घाडीगांवकर तसेच शिंदे गटाचे माजी नगरसेवक योगेश जाणकार देखील उपस्थित होते. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या परिसरातच दोन्ही गटांमध्ये राडा झाल्यानंतर दोन्ही गटाच्या समर्थकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. मात्र, हा लाठीचार्ज कोणा एका गटाची बाजू घेऊन केला असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक राम रेपाळे, योगेश जाणकार, राहुल लोंढे यांनी पोलीस आयुक्त जयजित सिंग यांची भेट घेऊन त्यांना चौकशी करण्याचे पत्र दिले आहे.

पोलिसांच्या कृतीतून कोणा एका गटाची बाजू घेवून लाठीमार केला असल्याचे दिसून येते. या पोलिसांसमवेत काही पोलीस नसलेली माणसे सुद्धा पोलीस म्हणून जमावावर लाठीमार करीत होते. जमावाला आम्ही स्वत: समजविले, नाहीतर प्रचंड मोठ्या प्रमाणात गंभीर परिस्थ‍िती निर्माण झाली असती असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. या लाठीमाराची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे शिंदे गटाने केली आहे.

दरम्यान, सोमवारी रात्री भटवाडी परिसरात खासदार राजन विचारे, संजय घाडीगांवकर यांच्यासोबत बाहेरुन आलेल्या समर्थकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. अश्लील भाषेचा वापर करुन घोषणा दिल्या. याचा जाब विचारण्याकरिता विभागातील हजारो नागरिक श्रीनगर पोलीस स्टेशन येथे दाखल झाले. यावेळी खासदार राजन विचारे यांच्यासोबत 40 ते 50 समर्थक बसलेले होते. त्याचवेळी त्यांच्यासोबत असलेल्या काही महिला व पुरूषांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासनाच्या विरोधात अश्लील भाषेत पोस्ट टाकल्या. यामुळे याबाबत तक्रार दाखल करण्याकरिता आलेल्या नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण होवून जमाव आक्रमक झाला होता.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news