मुंबई विमानतळावर ३२ कोटी रुपये किमतीचे ६१ किलो सोने जप्त | पुढारी

मुंबई विमानतळावर ३२ कोटी रुपये किमतीचे ६१ किलो सोने जप्त

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर कक्षाने शुक्रवारी कारवाई करत ३२ कोटी रुपये किमतीचे ६१ किलो सोने जप्त केले आहे. एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने जप्तीची विमानतळावर करण्यात आलेली ही एक मोठी कारवाई आहे. याप्रकरणी दोन महिलांसह सात आरोपी प्रवाशांना अटक करण्यात आली.

पहिल्या कारवाईत टांझानियाहून परतणाऱ्या चार भारतीयांकडून सोने जप्त करण्यात आले. हे सोने खास डिझाइन केलेल्या एका पट्ट्यात लपवून ठेवण्यात आले होते. त्याच्याकडून २८.१७ कोटी रुपये किमतीचे ५३ किलो वजनाचे सोन्याचे बार जप्त करण्यात आले आहेत. या प्रवाशांना भारतात सोने आणण्यासाठी पैशाचे आमिष दाखवण्यात आले होते. परंतु, त्यांना भारतातील सीमाशुल्क कायद्याबाबत माहिती नव्हती. त्यामुळे हे सर्व जण एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने घेऊन आले होते. दुसऱ्या कारवाईमध्ये, दुबईहून आलेल्या तीन प्रवाशांकडून ०३.८८ कोटी रुपये किमतीचे ८ किलो सोने जप्त केले. अटक आरोपी हे कतार एअरवेजच्या विमानाने मुंबईत आले होते. दोन प्रकरणांत एकूण सात प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. या रॅकेटचा तपास सुरू असल्याचे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Back to top button