Jitendra Awhad : माझ्या अटकेसाठी पोलिसांवर दबाव : जितेंद्र आव्हाड | पुढारी

Jitendra Awhad : माझ्या अटकेसाठी पोलिसांवर दबाव : जितेंद्र आव्हाड

ठाणे : पुढारी वृत्तसेवा :  थिएटरमधील प्रेक्षकांना आम्ही मारहाण केलेली नव्हती. तरीही आमच्याविरोधात तक्रार करण्यास त्यांना भाग पाडले, असा आरोप करून चौकशीसाठी बोलवून मला अटक करण्यात आली. माझ्या अटकेसाठी पोलिसांवर दबाव होता. त्यांची हतबलता दिसून आली, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आज (दि.१२) येथे केला. जामीन मिळाल्यानंतर आव्हाड पत्रकार परिषदेत बोलत होते.

आव्हाड Jitendra Awhad म्हणाले की, आम्ही केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत दाखविण्यात आलेल्या चुकीच्या विकृतीला विरोध केला होता. म्हणूनच आमच्यावर कायद्याचा कोणत्याही प्रकारचा आधार न घेता, चुकीचे कलम लावून महाराष्ट्राला दाखविण्यासाठी आम्ही कायदा कसाही मोडतोड करु शकतो, फेकू शकतो, हे उदाहरण सेट करण्यासाठीच ही अटक करण्यात आल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. यात पोलिसांचा काहीही संबंध नव्हता, त्यांच्यावर केवळ दबाव होता, म्हणूनच त्यांच्याकडून ही कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण होत असेल, तर त्याला आम्ही विरोध करणार आणि त्यासाठी आम्हाला ३६५ दिवस जरी जेलमध्ये टाकले, तरी त्याचे आम्ही स्वागत करु, असे आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता आव्हान दिले. त्यामुळे तुम्ही जेल काय फाशी दिली, तरी चालेल असेही त्यांनी सांगितले.

विवियाना मॉल मधील हरहर महादेव चित्रपटाच्या वेळेस मारहाण प्रकरणी आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. त्यांची शनिवारी जामिनावर सुटका करण्यात आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कलम ४१ (ए) अन्वये पहिली नोटीस आल्यानंतर सांयकाळी 5 वाजेर्पयत चौकशीला हजर राहावे, असे सांगण्यात आले होते. मात्र, दोन वाजता नोटीस दिल्यानंतर अडीच वाजता अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविक पाहता, अटक करण्यापूर्वी नियमानुसार ७२ तासाची संधी देणे अपेक्षित होते. त्यावेळेस माझे म्हणणे मांडता आले असते, मात्र तसे न करता केवळ दबावापोटी अटक करण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. त्यात शुक्रवारी अटक झाल्यानंतर कोर्टात हजर करता आले असते. मात्र सांयकाळ पर्यत वेळ काढण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. केवळ जेलमध्ये कसे ठेवता येईल, याची तजवीज करण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितले.

हरहर महादेव या चित्रपटात कशा पध्दतीने चुकीचा इतिहास दाखविण्यात आला, याचा पुरावाच यावेळी त्यांनी सादर केला. या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे हे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे दाखविण्याचा प्रयत्न केला आणि त्यालाच आमचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे चुकीचा इतिहासाला विरोध केला म्हणून जर आम्हाला अटक झाली असेल. तर ती आम्हाला मान्य असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु चुकीचे कलम लावून आव्हाडांना अटक कशी करता येईल. याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवर झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. इतिहासाचे विकृतीकरण होऊ नये, यासाठी आम्ही हा विरोध केला होता, आणि विरोध करत राहू, असेही त्यांनी सांगितले.
माराहाणीची तक्रार झाली, मात्र ज्याला मारहाण झाली, त्यानेच या प्रकरणात आव्हाड यांचा संबध नसल्याचे सांगितले. तर मॉल चालकाने देखील कुठेही तक्रार केलेली नाही. परंतु मला कसे अडकावयचे यासाठीच प्रयत्न झाल्याचे दिसून आले.

Jitendra Awhad : राज ठाकरेंनी स्क्रिप्ट माहीत नसेल का ?

राज ठाकरे यांनी विरोध करायला हवा होता. ज्यांचा या चित्रपटात आवाज आहे, त्यांना स्क्रीप्ट माहीत नसेल का? त्यांचे हृदय दुखावले नसले का? त्यात एवढे विकृतीकरण होत असताना राज ठाकरे यावर काहीच बोलत का नाही? असा सवाल त्यांनी केला. ते खुप हुशार आहेत, त्यामुळे त्यांनी अशा चित्रपटांना थांबविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही माफी मागावी, तुमचा चित्रपटातील आवाज मागे घ्यावा, असे मी सांगणार नाही, मात्र एखादी चुकीची गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर होत असेल, तर याला कुठेतरी विरोध झालाच पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटी-शर्थींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, ठाणे न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आव्हाड यांना काल शुक्रवारी अटक करण्यात आली होती. आव्हाड यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर आव्हाड यांच्यासह १२ जणांना जामीन मंजूर झाला आहे. दरम्यान, ठाण्याच्या वर्तकनगर पोलीस ठाण्यासमोर आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करुन जल्लोष केला. आव्हाड यांनी ‘जामीन मिळाला’ असे स्वतः ट्विट करत म्हटले आहे.

 

हेही वाचलंत का ? 

Back to top button