Thane : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याशी राष्ट्रवादीचा संबंध नाही: जितेंद्र आव्हाड | पुढारी

Thane : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याशी राष्ट्रवादीचा संबंध नाही: जितेंद्र आव्हाड

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : सुसंस्कृत आणि सांस्कृतिक म्हणवले जाणारे डोंबिवली शहर असुविधांचे शहर आहे. मात्र या शहरातील नागरिकांच्या सहनशीलतेला मी सलाम करतो, असा उपरोधिक टोला डोंबिवलीकरांना लगावत भाजपच्या पदाधिकारी संदीप माळीला पाठीशी घालणाऱ्या पोलिसांवर कारवाई झाली नाही. तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी मंत्री  जितेंद्र आव्हाड यांनी दिला. डोंबिवलीत पार पडलेल्या धरणे आंदोलनानंतर त्यांनी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी दसरा मेळाव्याच्या प्रश्नाला उत्तर देताना आमचा त्या दसरा मेळाव्याशी किंचितही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपचे पदाधिकारी संदीप माळी हे सतत चर्चेत असतात. त्यांच्यावर पोक्सोसहित बलात्कार, हाणामारी, दहशत माजवणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे, असे विविध गुन्हे दाखल आहेत. तरीही पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. या शहरात अशी गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, हा इशारा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतर्फे डोंबिवली येथील बाजी प्रभू चौकात धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये जितेंद्र आव्हाड, आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे, राष्ट्रवादीचे माजी खासदार आनंद परांजपे, प्रवक्ते महेश तपासे, कार्याध्यक्ष वंडार पाटील यांच्यासह, शहराध्यक्ष सुरेश जोशी, शिवसेनेचे सदानंद थरवळ, विवेक खामकर, शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी, काँग्रेसचे संतोष केणे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या सारिका गायकवाड आदी पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

आव्हाड पुढे असेही म्हणाले की, आमच्या कार्यकर्त्यांवर लहान सहान गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांना तडीपारीची नोटीस दिली जाते. आणि इकडे भाजप पदाधिकारी संदीप माळी यांच्यावर २२ गुन्हे दाखल असूनही ते बिंधास्त फिरत आहेत. इकडे कायद्याचे राज्य आहे की नाही असा संतप्त सवाल आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केला.

खड्डयांसंदर्भात बोलताना ते म्हणाले की,  कळवा आणि मुंब्रा शहर मागासलेले शहर होते. मात्र विकास कसा असतो ते बघायचे असेल. तर त्या शहरात येऊन पहा. असे सांगताना त्यांनी डोंबिवलीकरांच्या सहनशीलतेवर ताशेरे ओढले. याआधी राजकारणात वैचारिक मतभेद पाहिले होते. मात्र, आता हुकूमशाही सुरू असून, हिटलरने जशी ओळख निर्माण करण्यासाठी स्वतःची वेगळी आर्मी सुरू केली होती. त्याचप्रकारे संपूर्ण ठाणे जिल्ह्यात पोलिसांमार्फत राजकीय दहशत निर्माण करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

दसरा मेळाव्या संदर्भात विचारले असता त्यांनी शिवाजी पार्क, शिवतीर्थ, शिवसेना आणि दसरा मेळावा हे गेल्या कित्येक वर्षांपासूनचे समीकरण तयार झाले आहे. त्यांना आम्ही शुभेच्छा देणारे बॅनर लावले. याचा अर्थ आमचाही त्यात सहभाग असेल, असे नाही, हे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

Back to top button