ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी अभिजित बांगर यांची वर्णी | पुढारी

ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी अभिजित बांगर यांची वर्णी

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची बदली झाली असून त्यांच्याकडे एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार सोपवण्यात आला आहे. तर यापूर्वी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त असलेले अभिजित बांगर हे ठाणे महापालिकेचे नवे आयुक्त झाले आहेत. गुरुवारी रात्री बदलीची ऑर्डर निघाली. त्यानंतर शुक्रवारीच बांगर यांनी ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार स्विकारत नागरिकांना अपेक्षित असेल, अशा विकासाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.

राज्य शासनाने महत्वाच्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यामध्ये ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांचा देखील समावेश आहे. राजेश नार्वेकर यांची नवी मुंबई महापालिका आयुक्त पदी वर्णी लावण्यात आली असून नवी मुंबईचे आयुक्त अभिजित बांगर यांना ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त असताना नवी मुंबई शहराचा नियोजित विकास करण्यात बांगर यांचा मोलाचा वाटा असून ठाणे शहरात देखील अशाच प्रकारे विकास करण्याची ग्वाही अभिजित बांगर यांनी दिली आहे.

डॉ. विपीन शर्मा यांनी जून २०२० रोजी ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला होता. कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये त्यांनी आयुक्त पदाची सूत्रे हातात घेतली होती. योग्य नियोजन करून त्यांनी कोरोनाचा कहर आटोक्यात आणला. मात्र अवघे दोन वर्ष ३ महिनेच ते ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी राहू शकले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुदतवाढीसाठी त्यांचे प्रयन्तही सुरु असल्याची चर्चा होती मात्र अखेर गुरुवारी उशिरा बदलीची ऑर्डर निघाल्यानंतर या सर्व चर्चाना पूर्णविराम मिळाला.

नागरिकांना अपेक्षित असे काम करण्याला प्राधान्य देणार आहे. यामध्ये नागरिकांची व्यावसायिक, कार्यक्षम अशी प्रतिमा निर्माण होईल, या दृष्टीने प्रयत्न करणार असून नागरिकांचे सहकार्य मिळेल, असा विश्वास डॉ. विपीन शर्मा यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचलंत का ?

 

 

 

Back to top button