Navratri Special: सातपुडा डोंगरावर वसलेली नवसाला पावणारी आई जीवदानी! | पुढारी

Navratri Special: सातपुडा डोंगरावर वसलेली नवसाला पावणारी आई जीवदानी!

विरार; पुढारी वृत्तसेवा : विरार येथील एका उंच डोंगरावर जीवदानी आईचं मंदिर आहे. कधी काळी या शहराचं नाव एक-वीरा होतं, असं म्हटलं जातं. त्या काळी या मंदिराला एकवीरा देवी या नावानेही ओळखलं जातं होतं. मोघल आणि पोर्तुगीजांच्या आक्रमणात या मंदिराला इजा पोहोचवली गेली होती. त्यावेळी काही स्थानिक लोक या डोंगरावर देवीच्या दर्शनाला येत. त्यांच्याच आस्थेमुळे देवीची महती पुढील पिढीत मिळाली. देवीचं मंदिर वैतरणा नदीच्या तटावर व सातपुडा पर्वतराजींच्या कुशीत वसलेलं आहे. वर्तमान काळात भाविकांत आई जीवदानी देवी म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे.  (Navratri Special)

एका पौराणिक कथेनुसार, राजा दक्षाने पूजेदरम्यान देवाधिदेव शंकराचा अपमान केल्याने आदिशक्तीने स्वत:ला अग्निहोत्रात समर्पित केलं होतं. आदिशक्तीचं हे शरीर शंकर घेऊन जात असताना भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने या शरीराचे ५१ तुकडे केले. हे तुकडे ज्या ठिकाणी पडले, ती ठिकाणं शक्तीपीठं बनली. जीवदानी हेदेखील त्यापैकी एक स्थान आहे.

Navratri Special : या स्थानाबाबत अनेक आख्यायिकाही आहेत

या स्थानाबाबत स्थानिक लोकांत अनेक आख्यायिकाही आहेत. त्यातीलच एक आख्यायिका अशी, येथील एका गावात एक गुराखी होता. याच डोंगराच्या पायथ्याशी तो आपली गुरं चरायला नेत असे. त्याच्या गुरांसोबत आणखी एक गाय चरायला यायची; परंतु संध्याकाळ होताच ती गाय नजरेआड होत असे. एक दिवस गायीच्या मालकाच्या शोधात हा गुराखी डोंगरावर गेला; पण गाय डोंगरावर चढताच दृष्टीआड झाली. त्याचवेळी त्या ठिकाणी एक देवी प्रकट झाली. गुराख्याने गायीला चरवण्याच्या बदल्यात देवीजवळ मोबदला मागितला. गुराख्याचं म्हणणं ऐकून घेत देवीने त्याच्या हातावर एक कोळसा टेकवला.

देवीच्या या वागण्याने गुराखी नाराज झाला व त्याने तो कोळसा जमिनीवर फेकून दिला. यानंतर गुराखी गावात परतला. घडला प्रकार त्याने अन्य ग्रामस्थांना सांगितला. गावकरी आश्चर्यचकित झाले. त्यांनी गुराख्याला समज दिली. कोळसा शुभ असतो, असं त्याला सांगितलं. गुराख्याच्या झाली चूक लक्षात आली. त्याने देवीची माफी मागितली. देवीनेही त्याला मोक्ष प्रदान केला. आशीर्वादात त्याला सांगितलं की, गाय कामधेनु असते. ती तुला मोक्ष प्रदान करेल!

याच कथेचा शेवट काही लोक थोडा वेगळ्या प्रकारेही सांगतात. तो असा. देवी दृष्टीआड झाली तसा गायीने हृदयविदारक हंबरडा फोडला आणि कड्यावरून स्वत:ला झोकून दिले. या बलिदानाचे रहस्य अजून कोणाला उलगडलेले नाही; पण तिने आपल्या जीवाचे दान केलं म्हणून या डोंगराला जीवदानीचा डोंगर व तेथे वास करणारी आदिमाता म्हणून जीवदानी देवी प्रसिद्ध झाली.

Navratri Special : मंदिराची निर्मिती पांडवांनी वनवासात असताना केल्याची आख्यायिका

जीवनदानी म्हणजे जीवनदायीनी! ऐतिहासिकदृष्ट्या हे मंदिर अत्‍यंत प्राचीन आहे. या मंदिराची निर्मिती पांडवांनी वनवासात असताना केल्याची आख्यायिकाही सांगितली जाते. येथील एका विराने गुंफेत पाच पांडवांनी देवीची स्थापना केली होती. हे स्थान ‘पांडव डोंगरी`सदृश बनवलं गेलं. हे स्थान योगी, संत आणि ऋषी यांचं निवासस्थान होतं. आजही अनेक योगीपुरुष आणि ऋषी देवदर्शनादरम्यान मंदिर परिसरात निवासाला असतात.

या देवस्थानाबाबत आणखीही काही आख्यायिका सांगितल्या जातात. आई जीवदानीचं मंदिर १७ व्या शतकात बनवलं गेल्याचं म्हटलं जातं. अन्य मंदिरांप्रमाणेच या मंदिरांतही जलकुंडांची निर्मिती केली होती; मात्र पूर्वीच्या तुलनेत या मंदिरांत आजघडीला अनेक बदल झालेले आहेत. यातील अनेक जलकुंड नामशेष झाले आहेत. मंदिरापर्यंत जाण्यासाठी भाविकांना अंदाजे १३०० पायऱ्या चढून जावं लागतं. आई जीवदानीचं मंदिर पूर्वी खूपच लहान होतं. पायऱ्याही चढणीच्या होत्या. मात्र वेळेनुसार यात अनेक बदल करून भाविकांच्या सोयीनुसार त्यांची निर्मिती केली गेली आहे.

नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती

१९४६ ते ५६ या काळात बारकीबाय नावाची भक्त रोज गडावर जाऊन नेमाने देवीची पूजा करीत असे. त्यानंतर १९५६ मध्ये देवीच्या भक्तांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. सौम्य शीतल, प्रसन्न अशा या मूर्तीच्या डाव्या हाती कमलपुष्प आहे. तर उजव्या हाताने माता भाविकांना आशीर्वाद देत आहे. त्यापूर्वी देवीची लाकडी मूर्ती होती. २३ फेब्रुवारी १९५६ मध्ये जीवदानी मंदिर ट्रस्टची स्थापना झाली.

आजही भाविकांत आई जीवदानीविषयी प्रचंड श्रद्धा आहे. त्यामुळे नवसाला पावणारी देवी म्हणूनही या मंदिराची ख्याती आहे. देशभरातील देवीभक्त या ठिकाणी दर्शनाकरीता येत असतात. आपल्या दु:खांचं निवारण व्हावं, आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून आईला साकडं घालत असतात.

या मंदिरात दरदिवशी शेकडो भाविक येत असतात; मात्र नवरात्रीतील नऊ दिवस आणि अन्य उत्सवादरम्यान ही संख्या हजारोंच्या घरात असते. पवित्र मनाने मनोकामना करणाऱ्या भक्तांची प्रत्येक इच्छा आई पूर्ण करते, अशी भाविकांत श्रद्धा आहे. सुरुवातीला कमी प्रमाणात भाविक येत. अरुंद पायवाट व कुठल्याही सुविधा नसलेले असे हे स्थान होते. हळूहळू मंदिराचा जीर्णोद्धार होत गेला. जुन्या मातीच्या पायऱ्या होत्या. त्यानंतर १९९१ मध्ये जवळपास १ हजार २५० सिमेंटच्या पायऱ्या बांधण्यात आल्या. या चढून उंचावरील जीवदानी मंदिरात जावे लागते.

Navratri Special : डोंगरावर जाण्यासाठी दोन ‘रोप-वे`

डोंगरावर चढताना दुतर्फा हिरवीगार वनराजी आहे. मंदिरात जाण्यासाठी पायऱ्यांशिवाय पाचपायरी हा जुना मार्ग असून येथून भाविक पायवाटेने जातात. विविध नवस करणे आणि ते फेडण्यासाठी भाविक आजही या मार्गाची निवड करतात. मार्ग डोंगराळ आहे. जवळपास २० वर्षांपूर्वी जीवदानी देवीचे भव्य मंदिर बांधण्याचं काम सुरू झालं. डोंगराच्या कुशीत उभी राहिलेली सात मजली इमारत बांधण्यास अनेक वर्षं लागली. आजही या इमारतीचे किरकोळ काम सुरू आहे. देवीच्या मूर्तीसमोर भव्य सभामंडप असून त्यात ५ हजारांहून अधिक भाविक बसू शकतात.

या परिसराचा गेल्या काही वर्षांत कायापालट झाला आहे. त्यामुळे डोंगरावरील पायऱ्या व विश्रांती शेडचे नूतनीकरण होते आहे. परिसरात ९० सीसीटीव्ही असून इंटरनेटवर लाईव्ह दर्शन घेण्याचीही सोय आहे. डोंगरावर ७ मजली इमारतीचे काम सुरू असताना १० वर्षांपूर्वी बांधकाम साहित्य डोंगरावर नेण्यासाठी एक ट्रॉली सुरू झाली. तिचे रूपांतर रोपवेमध्ये झाले आहे. आज पायथा ते डोंगरावर जाण्यासाठी दोन ‘रोप-वे` आहेत. या रोपवेमधून ज्येष्ठ नागरिकांसह इतर लोकही जाण्याचा आनंद घेतात.

Navratri Special : डोंगरावर कोंबड्या, बकरे कापण्यास बंदी

जीवदानीचा डोंगर हरित ठेवण्यासाठी ट्रस्ट दरवर्षी वृक्ष लागवडीसाठी मोठा खर्च करत आहे. ट्रस्टच्या ५ मोबाईल ॲम्ब्युलन्स असून या गावोगावी जाऊन आरोग्यसेवा पुरवितात. मंदिर पायथ्याशी ट्रस्टचा दवाखाना सुरू आहे. मंदिरात जमा होणाऱ्या निर्माल्यातून खतनिर्मिती केली जाते. तसेच, देवीला हजारो भाविक नारळ अर्पण करतात. त्यातून नारळवडीचा प्रसाद भाविकांना दिला जातो. ट्रस्टच्या वतीने दहा रूपयांत घरगुती पोटभर जेवणही येथे भाविकांना दिले जाते. दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंगची पुरेशी सोय आहे. ट्रस्टने गडावर कोंबड्या किंवा बकरे कापण्यास बंदी घातली आहे. नवरात्रात मंदिराला विद्युत रोषणाई आणि दरदिवशी फुलांची आकर्षक सजावट केली जाते. देवी मूर्तीच्या बाजूला पाषाण आहे. या पाषणावर सुपारी चिकटवून देवीचा कौल घेण्यासाठीही भाविक आवर्जून येतात.

हेही वाचलंत का ? 

Back to top button