सिंधुदुर्ग : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराचा मुख्य दरवाजा तयार करण्याचा मान सिंधुदुर्गला | पुढारी

सिंधुदुर्ग : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराचा मुख्य दरवाजा तयार करण्याचा मान सिंधुदुर्गला

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर येथील श्री देवी आई अंबाबाई मंदिराचा मुख्य दरवाजा व आतील दरवाजा तसेच मिरवणूक रथ करण्याचे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील नेरूर गावचे विलास मेस्त्री व श्यामसुंदर मेस्त्री यांच्या नियोजनाखाली होत आहे. ही बाब सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मोठ्या मानाची व गौरवास्पद आहे. याबाबत सर्वत्र या मेस्त्री कुटुंबीयांचे कौतुक करण्यात येत आहे.

श्री देवी आई अंबाबाई मंदिर कोल्हापूर हे भारतातील हे सुप्रसिद्ध असे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. आज या मंदिराचा मुख्य दरवाजा व गाभार्‍यातील दरवाजा व मिरवणूक रथ नव्याने करण्याचे देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूरतर्फे ठरविण्यात आले आहे. सदर दरवाजा सागवानी लाकडामध्ये व प्रत्येक दरवाजा 90 किलो चांदीचा भराव वापरून करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे भाविकांनी मोठ्या प्रमाणात चांदी व सागवान लाकूड अंबाबाई दरवाजासाठी दिले आहे. याचबरोबर श्री देवी अंबाबाईचा पालखी रथ हासुद्धा नव्याने सागवान व चांदी वापरून करण्यात येत आहे. गेले दहा-पंधरा दिवस आई अंबाबाई मंदिराचा मुख्य दरवाजा सागवानी लाकडामध्ये करण्याचे काम सुरू आहे. सदर दरवाजा घटस्थापनेपूर्वी बसविण्याचा मानस देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूरचा असून रविवारी तो पूर्णत्वास आला आहे. नवरात्र उत्सवापूर्वी मुख्य दरवाजा बसविण्याचे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे व कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. साधारण पाचशे किलोच्या वजनाचा हा दरवाजा असून, सदर दरवाजा हा नेरूर गावचे सुपुत्र विलास मेस्त्री व श्यामसुंदर मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे.

विलास मेस्त्री यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही देवस्थानांचे छप्पर व सभामंडप कारवीन सागवानी लाकडात केली आहेत. तीसुद्धा पाहण्यासारखी आहेत. यामध्ये प्रामुख्याने श्री देव कलेश्वर मंदिर, श्री देव कुडाळेश्वर, श्री देव रामेश्वर वेंगुर्ले आणि वालावल लक्ष्मीनारायण मंदिर या ठिकाणी सागवानी लाकडात कोरीव काम जे केले, ते पाहिल्यावर पश्चिम देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूरच्या पदाधिकार्‍यांनी अंबाबाई मंदिराचा मुख्य दरवाजा व रथाचे काम करण्याचे विलास मेस्त्री यांना सांगितले. त्याप्रमाणे गेली पंधरा दिवस या दरवाजाचे काम सुरू आहे. संतोष मेस्त्री, समीर गावडे, महेश मेस्त्री, राजन मेस्त्री, प्रदीप मेस्त्री, वैभव मेस्त्री हे या ठिकाणी काम करत आहे. आई अंबाबाई मंदिर कोल्हापूरच्या मुख्य दोन्ही दरवाजे व पालखी मिरवणूक रथाचे काम करण्यामध्ये श्री देव लक्ष्मीनारायण स्थानिक सल्लागार उपसमिती वालावलचे लक्ष्मण उर्फ गुरू देसाई यांनी विशेष मेहनत घेतली आहे. आज कोल्हापूरच्या आई अंबाबाईच्या देवळाच्या मुख्य दरवाजाचे काम करण्याची संधी आपल्याला मिळाली हे आपल्या भाग्याचे असून ते उत्तम प्रकारे करणार असल्याचे विलास मेस्त्री यांनी सांगितले.

Back to top button