‘भीमाशंकर’च्या सभासदांची दिवाळी गोड होईल; माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची ग्वाही | पुढारी

‘भीमाशंकर’च्या सभासदांची दिवाळी गोड होईल; माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची ग्वाही

मंचर; पुढारी वृत्तसेवा: भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांची दिवाळी निश्चितच गोड होईल. कारखान्याच्या निवडणूक आचारसंहितेमुळे बाजारभावाची घोषणा तूर्त करता येत नाही, अशी माहिती माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
पारगाव दत्तात्रयनगर (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या 26 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना वळसे पाटील बोलत होते. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गावडे, विवेक वळसे पाटील, देवदत्त निकम, मानसिंगभय्या पाचुंदकर, केशरताई पवार, तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष भगवान वाघ, पारगावचे सरपंच बबनराव ढोबळे यांसह संचालक मंडळ, सभासद आणि कर्मचारीवर्ग उपस्थित होता.

या वेळी वळसे पाटील म्हणाले की, या वर्षी जनावरांना लम्पी आजार आला असून, थोड्याच दिवसांत भीमाशंकर सहकारी साखर कारखाना चालू होणार आहे. त्यामुळे या वर्षीचा गळीत हंगाम आव्हानाचा असून, आपल्या सर्वांना मिळून या वर्षीसुद्धा विक्रमी गाळप करायचे आहे. कारखान्यावर आलेल्या जनावरांचे लसीकरण व इतर उपाययोजना कारखाना प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी कारखान्याने 11लाख 86 हजार 426 मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप केले होते. दिवसेंदिवस उसाची लागवड वाढल्याने आपले शेत लवकर रिकामे व्हावे. यासाठी शेतकरी वारंवार कारखान्यात येत असतात.

त्यामुळे कारखान्याची गाळपक्षमता वाढवली असून, मागील वर्षी कोरोनाकाळातही कारखान्याने उत्तम काम केले आहे. कारखान्यात लवकरच 16 मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी 41 कोटी रुपये खर्च येणार आहे. डिस्टिलरी प्रकल्प उभारण्यासाठी सर्व पूर्तता झाली असून, त्याचे प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी 137 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दसर्‍याला बॉयलरचे पूजन करण्यात येणार असून, दहा ते पंधरा तारखेपर्यंत कारखाना सुरू होईल.

कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे म्हणाले की, भीमाशंकर कारखान्याकडे शेतकर्‍यांनी उसाची नोंद करून ऊस गाळपास देण्यासाठी प्राधान्य द्यावे. नोंद केलेला ऊस इतर कारखान्यांकडे देऊ नये. शेतकर्‍यांच्या प्रगतीसाठी भीमाशंकर कारखाना कटिबध्द असल्याची ग्वाही त्यांनी दिली. सूत्रसंचालन डॉ. सुदाम खिलारी आणि नीलेश पडवळ यांनी केले. ज्ञानेश्वर गावडे यांनी आभार मानले.

आढळराव पाटील यांचे मानले आभार
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सहकार्य केल्याबद्दल दिलीप वळसे पाटील यांनी त्यांचे आभार मानले. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसबरोबर इतरांनीही सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.

 

Back to top button