Mumbai Trans Harbour Link: मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या कामाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या कामाची पाहणी करताना  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या कामाची पाहणी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम ८४ टक्के पूर्ण झाले आहे. पुढील वर्षी डिसेंबरपूर्वी हा प्रकल्प (Mumbai Trans Harbour Link) पूर्ण होईल. त्यामाध्यमातून रायगड जिल्ह्यातील चिर्ले जवळील पेण, पोयनाड परिसरात ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. लॉजिस्टिक्स पार्क, टाऊनशिप आणि रोजगार निर्मिती या तीन बाबींवर लक्ष केंद्रित केले जाणार असून त्यामाध्यमातून याभागाचा सुनियोजितपणे विकास होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.१४) येथे व्यक्त केला.

शिवडी येथून सुरू झालेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष सागरी सेतूवर जाऊन कामाचा आढावा घेतला. यावेळी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त श्रीनिवास यांनी कामाबाबत माहिती दिली.

Mumbai Trans Harbour Link : दिवसाला एक लाख वाहनांची ये-जा करण्याची क्षमता

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईला रायगड जिल्ह्याशी थेट जोडणारा हा २२ किमी लांबीचा देशातील सर्वाधिक मोठा पहिला सागरी सेतूमार्ग आहे. या सागरी सेतूवरून दिवसाला किमान एक लाख वाहनांची ये-जा करण्याची क्षमता असून नागरिकांच्या वेळेची तसेच इंधनाची मोठी बचत होईल. प्रदूषण विरहित असा हा प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचे काम करताना पर्यावरणासोबतच फ्लेमिंगोंची देखील काळजी घेण्यात आली असून गेल्या वर्षी पेक्षा यंदा जास्त फ्लेमिंगो आल्याचे त्यांनी सांगितले. या सागरी सेतूमुळे मुंबई ते रायगड जिल्ह्यातील चिर्ले हे अंतर केवळ १५ ते २० मिनिटात पार करणे शक्य होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

एमटीएचएल प्रकल्प ईस्टर्न फ्री वेला जोडणार

राज्याच्या सकल उत्पन्नात सर्वाधिक वाटा मुंबई महानगर क्षेत्रातून येत असून या भागातील नागरिकांना हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक चिर्ले गावाजवळून मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाला जोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर हा प्रकल्प ईस्टर्न फ्री वे ला जोडणार असल्याने थेट रायगडच्या दिशेने प्रवास करणे शक्य होणार आहे. शिवाय मुंबई – वरळी कोस्टल रोड देखील शिवडी वरळी कनेक्टरमार्गे हा प्रकल्प जोडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

ओएसडी जपानी तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर

याप्रकल्पाचे काम करताना ऑर्थोटॉपीक स्टील डेस्क (ओएसडी) या जपानी तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर पहिल्यांदाच करण्यात आला आहे. त्याचे वजन काँक्रीटपेक्षा कमी असून वेगाने काम होण्यास मदत होत आहे. पर्यावरणपूरक असा हा प्रकल्प असून त्याच्या माध्यमातून वर्षाला सुमारे २६ हजार टन कार्बनडायऑक्साईड कमी होणार आहे. ३ पॅकेजच्या माध्यमातून या प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी शिवडी प्रकल्प कार्यालयास मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. श्रीनिवास यांनी प्रकल्पाबाबत सादरीकरण केले.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news