ठाणे: स्टेट बँकेतून बोलतोय असे सांगून कल्याणमध्ये एकाकडून सव्वादोन लाख उकळले

ठाणे: स्टेट बँकेतून बोलतोय असे सांगून कल्याणमध्ये एकाकडून सव्वादोन लाख उकळले

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : मी स्टेट बँकेतून बोलतोय, तुम्ही आमच्या बँकेचे खातेदार आहात हे निश्चित करण्यासाठी केवायसी करणे आवश्यक आहे. तुमची आवश्यक कागदपत्रे पाठवून द्या, ती कागदपत्रे ऑनलाईन केल्यानंतर तुम्हाला येणारा गुप्त संकेतांक मला कळवा, असे कल्याणमधील एका ज्येष्ठ नागरिकाला मोबाईलद्वारे सांगितल्यानंतर त्यांच्या आणि पत्नीच्या खात्यामधील एकूण 2 लाख 24 हजार 987 रुपयांची रक्कम एका भामट्याने स्वत:च्या नावे वळती करुन फसवणूक केली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेकडील वसंत व्हॅली गृहसंकुलातील सुखवास्तू येथील अरूण किशन शर्मा (वय 65) यांना 25 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता एका मोबाईलवरुन फोन आला. मी स्टेट बँकेतून बोलतो आहे. तुमच्या खात्याचे केवायसी नुतनीकरण करायचे आहे. त्यासाठी तुम्ही आम्हाला तुमचे व पत्नीचे आधारकार्ड, पॅन कार्ड, बँक खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक अशी माहिती द्या, असे समोरच्या व्यक्तीने सांगितले.

बँकेचे व्यवहार सुरळीत रहावेत यासाठी अरूण शर्मा यांनी विनाविलंब सदर तोतयाने मागितलेली कागदपत्रे ऑनलाईन पध्दतीने पाठवली. ही कागदपत्रे जमा केल्यानंतर अरूण शर्मा यांना एक गुप्त संकेतांक आला. तोही त्यांनी भामट्याला स्वत:हून फोन करुन दिला. आपली फसवणूक होणार आहे, हे अरूण शर्मा यांच्या लक्षात आले नाही. हा गुप्त संकेतांक भामट्याने घेताच अरुण यांच्या पत्नी आणि स्वतःच्या स्टेट बँकेतील संयुक्त बँक खात्यामधून 2 लाख रुपये आणि अरुण आणि त्यांची मुलगी रिया यांच्या खात्यामधून 24 हजार 987 रुपये असे एकूण 2 लाख 24 हजार 987 हजार रूपये भामट्याने दोन व्यवहारांमध्ये स्वत:च्या बँक खात्यामध्ये वळते करुन घेतले.

हा प्रकार अरूण शर्मा यांच्या निदर्शनास आला. त्यांनी पासबुक व्यवहाराचे अद्ययावतीकरण केले, तेव्हा त्यांना आपल्या बँक खात्यामधून परस्पर पैसे वळते करण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यांनी बँकेला घडला प्रकार सांगितला. अरूण शर्मा यांना बँकेकडून फसवणूक झाल्याची माहिती दिली. हे कळताच त्यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात व्यक्तिविरुध्द तक्रार केली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल करुन पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news