ठाणे : पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून महाप्रसादावेळी भंगारवाल्यावर हल्ला | पुढारी

ठाणे : पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून महाप्रसादावेळी भंगारवाल्यावर हल्ला

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील आंबिवली स्टेशनजवळ असलेल्या लहुजीनगर क्रांतीनगर झोपडपट्टीमध्ये मंगळवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ५ जणांनी घुसून एकावर जीवघेणा हल्ला केला. तेथील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपामध्ये आयोजित केलेल्या भंडाऱ्याच्या पंगतीत भोजनासाठी बसलेल्या भंगारवाल्याला तू पोलिसांचा खबरी आहेस, तू आमची माहिती पोलिसांना देतोस, असा संशय घेऊन सशस्त्र ५ जणांनी मिळून बेदम मारहाण केली. शिवाय तोंडावर मूर्च्छा येईल, अशा औषधाचा फवारा मारून बेशुद्ध पडलेल्या भंगारवाल्यावर चॉपरने सपासप वार करून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बाप्पाच्या मंडपात एकच हलकल्लोळ माजला. जीवघेण्या हल्ल्यात भंगारवाला थोडक्यात बचावला असून खडकपाडा पोलिसांनी मारेकऱ्यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.

जाफर इसूफ उर्फ अशोक इराणी (वय २८, रा. झोपडपट्टी, भास्कर शाळेच्या समोर, पाटीलनगर, आंबिवली) असे हल्ल्यातून बचावलेल्या भंगारवाल्याचे नाव आहे. तर काशीम मुक्तार इराणी (वय २५), अब्दुल्ला इराणी (वय २०), गोट्या उर्फ सतीश लष्करे (वय २०), सोन्या पवार (वय १९), रईस (वय २८) अशी हल्लेखोरांची नावे असून हे सर्वजण तेथील पाटीलनगर इराणी कबिल्यात राहणारे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, जखमी जाफर इसूफ उर्फ अशोक याने क्रांतीनगर गणेशोत्सव मंडपात जाऊन मंगळवारी रात्री दीड वाजता गणपतीचे दर्शन घेतले. तेथे सुरू असलेल्या भंडाऱ्याच्या पंक्तीत तो जेवणासाठी बसला. जेवण सुरू असताना जाफरला पाहून तेथे काशीम इराणी आणि त्याचे इतर साथीदार आले. त्यांनी जेवणाऱ्या जाफरला जाब विचारला. काय रे तू जास्त शहाणा झालास काय, तुला जास्त अक्कल आली आहे काय, असे बोलत तू आमची माहिती पोलिसांना देतोस आणि तू आता पोलिसांचा खबरी होणार आहेस का, असे बोलत जाफरला जेवत्या ताटावर लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

जाफरच्या तोंडावर कसल्यातरी बाटलीतून फवारा मारण्यात आल्यानंतर तो बेशुद्ध पडला. या संधीचा गैरफायदा घेत टोळक्याने त्याच्यावर चॉपरने सपासप वार केले. या हल्ल्यात जाफर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. जाफर ठार झाल्याचे वाटल्याने हल्लेखोर काशीम इराण्यासह त्याच्या साथीदारांनी मंडपातून पळ काढला. अचानक घडलेल्या घटनेनंतर मंडपात साऱ्यांची पळापळ झाली.

एकीकडे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जखमी जाफरला उचलून हॉस्पिटलकडे हलविले. तर दुसरीकडे या घटनेची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. प्राथमिक उपचारानंतर शुद्धीवर आलेल्या जाफरने जबानी दिली. या जबानी वजा तक्रारीवरुन पोलिसांनी फरार ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. हल्लेखोर सराईत गुन्हेगार असल्याचा पोलिसांना संशय आहे. खडकपाडा पोलिसांचे पथक या टोळक्याचा शोध घेत आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button