नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीतील 'राजपथ' या प्रतिष्ठित मार्गाचे नाव 'कर्तव्यपथ' (Kartavya Path) ठेवण्याच्या प्रस्तावाला नवी दिल्ली नगर पालिका परिषदेने (एनडीएमसी) परवानगी दिली आहे. एनडीएमसीच्या विशेष बैठकीत राजपथाचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवण्यात आला. आता राजपथाचे नामफलक हटवून 'कर्तव्यपथा'चे फलक लावण्यात येतील. संबंधित प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी आयोजित विशेष बैठकीत केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी, सतीश उपाध्याय, कुलजीत चहल यांच्यासह सर्वच सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या बैठकीला उपस्थित नव्हते.
सरकारने ऐतिहासिक राजपथ तसेच राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट पर्यंत पसरलेल्या सेंट्रल विस्टा लॉनचे नाव बदलून कर्तव्यपथ करण्याचा निर्णय घेतला होता. आता एनडीएमसीने प्रस्तावाला मंजुरी दिल्याने इंडिया गेटवरील नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेपासून राष्ट्रपती भवन पर्यंतचा पूर्ण मार्ग आणि परिसर कर्तव्यपथ (Kartavya Path) म्हणून ओळखला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, गुरूवारी संध्याकाळी संपूर्ण परिसराचे उद्घाटन करतील, अशी माहिती समोर आली आहे.
राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट पर्यंतचा मार्ग राजपथ म्हणून ओळखला जातो. ३ किलोमीटर लांब या मार्गावरून दरवर्षी भारतीय सामर्थ्याचे प्रतिक प्रजासत्ताक दिनाचे पथसंचलन सोहळा मोठ्या थाटात पार पडतो. ब्रिटिश राजवटीच्या काळात या मार्गाचे नाव 'किंग्जवे' असे होते. स्वातंत्र्यानंतर त्याचाच अनुवाद करून 'राजपथ' असे नामकरण करण्यात आले. याशिवाय लुटियन्स दिल्लीतील ५ रस्त्यांची नावे बदलण्याची मागणी भाजपने एनडीएमसीकडे केली होती. या मागणीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
अकबर रोड, तुघलक रोड ही नावे गुलामगिरीचे प्रतिक असून ती बदलण्यात यावी, अशी मागणी भाजपने केली आहे. अद्याप, यासंदर्भात एनडीएमसी ने कुठलाही निर्णय घेतलेला नाही.