कल्याणमध्ये तृतीय पंथीयांनी सुरू केला ‘गरीबाची थाळी’ उपक्रम | पुढारी

कल्याणमध्ये तृतीय पंथीयांनी सुरू केला 'गरीबाची थाळी' उपक्रम

कल्याण; पुढारी वृत्तसेवा : महराष्ट्रामध्ये मतदार यादीतील सर्वाधिक तृतियपंथीयांची नोंद ही ठाणे जिल्ह्यात असून, या संख्येमध्ये वाढ होऊन ती 784 इतकी झाली आहे. लवकरच ही संख्या 1000 च्या आसपास होईल असा विश्वास ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केला. तृतीय पंथी संचलित ख्वाहिश फाउंडेशनच्या वतीने गरिबांची थाळी या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या परिसरात हा नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत दहा रुपयांत थाळी आणि एक रुपयांमध्ये नाश्ता दिला जाणार आहे.

  वृद्धांसाठी ज्या योजना लागू करण्यात आल्या आहेत त्या योजनेत वयोवृद्ध तृतीय पंथीयांचा समावेश करण्यात येईल असे आश्वासन यावेळी राजेश नार्वेकर यांनी दिले. तृतीय पंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा गरीब थाळीचा पथ दर्शी प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. या गरीब थाळी केंद्राच्या माध्यमातून आदिवासी, गरीब गरजू विधवा माहिला आणि तृयीत पंथीय यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून सात तृतीय पंथीय 12 वीची आणि तीघेजण बी कॉमची परिक्षा देणार आहेत. तृतीयपंथी, गरजू, विधवा आणि आदिवासी निराधारांना आसरा नाही. त्यांच्याकरीता मुरबाड येथे दहा एकर जागा आहे. त्याठिकाणी निवारा उभा करण्याकरीता बांधकाम साहित्याची गरज आहे. ते देण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी अध्यक्ष तमन्ना मन्सुरी यांनी यावेळी केली.

हेही वाचा

Back to top button