ऐन गणेशोत्सवात विजेचा लपंडाव, अंदर मावळात पाणीपुरवठा बंद झाल्याने महिला त्रस्त | पुढारी

ऐन गणेशोत्सवात विजेचा लपंडाव, अंदर मावळात पाणीपुरवठा बंद झाल्याने महिला त्रस्त

टाकवे बुद्रुक, पुढारी वृत्तसेवा: गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी वीज गायब झाल्याने केलेली झगमगीत आरास, विद्युत रोषणाई, गणेश भक्तीच्या गीतांचा दणदणाट कुठेही अनुभवायला मिळाला नसल्याने नागरिक निराश झाले आहेत. बुधवारी सकाळी गणरायचे आगमन झाले आणि सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने आंदर मावळातील 20 ते 25 गावाची वीज गायब झाली होती. शुक्रवारी मध्यरात्री वीजपुरवठा पूर्वरत करण्याचा प्रयत्न महावितरण केला. परंतु अद्याप संपूर्ण आंदर मावळात पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा झाला नसल्याने नागरिक तक्रार करत आहेत.

वीज पुरवठा खंडित असल्याने गावोगावी नळपाणी पुरवठा सुद्धा ठप्प आहे. यामुळे महिला वर्गाचे ऐन सणासुदीच्या काळात कामाचे नियोजन कोलमडले असून वीज पुरवठा व त्याबरोबर नळपाणी पुरवठा सुरळीत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. आंदर मावळातील महिलांना यंदाच्या वर्षी गणपती सणाला अंधारात साजरा करावा लागला. पारंपरिक पद्धतीने गावातील रात्रीच्या वेळेस महिला एकत्रीत येऊन गौरी गणपती गाणी म्हणतं फुगडी, गर्भा, गवळणी, अभंग म्हणतं ठेका धरायचा. मात्र, यावर्षी गणपती बाप्पा आगमनापासून महावितरण वीज गायब झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी चांगलीच तरांबळ उडाली. यावेळी महावितरणच्या हालगर्जीपणा समोर आला आहे.

मीडियावर होतेय लाइटची विचारणा

कुठलीही पूर्वसूचना न देता अचानकपणे वीजपुरवठा खंडित होत असल्याने स्थानिक वायरमन तसेच संबंधित अधिकार्‍यांशी कोणताही संपर्क होत नसल्याने लाईट कधी येणार, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आता सोशल मीडियाचा आधार घेतला जात आहे.गावातील प्रमुख व्हाट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये गावातील तरुण सध्या लाइट संदर्भातच मेसेज टाकताना दिसत आहेत. अनेकजण महावितरणच्या अधिकार्‍यांशी केलेल्या चर्चेची रेकॉर्डिंग सोशल मीडियावर टाकून लाईट का गेली आहे, कधी येणार याची खातरजमा करताना दिसत आहेत.

तळेगाव सब स्टेशनवरून मुख्य लाईनमध्ये अधिक प्रमाणात तांत्रिक बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. वीजपुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत लवकर सर्व ठिकाणी वीजपुरवठा चालू होईल.
– विजय दिवटे, अभियंता वडगाव मावळ

Back to top button