आढळाचे पाणी संगमनेरला देण्यास विरोध, अकोले तालुक्यातील आढळा परिसरातील पाच गावांमध्ये पाळला कडकडीत बंद

आढळाचे पाणी संगमनेरला देण्यास विरोध, अकोले तालुक्यातील आढळा परिसरातील पाच गावांमध्ये पाळला कडकडीत बंद
Published on
Updated on

गणोरे, पुढारी वृत्तसेवा: अकोले तालुक्यातील आढळा धरणातून संगमनेर तालुक्यातील गावांना पाणी देण्यास विरोध करण्यासाठी आढळा परिसरातील पाच गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. संगमनेर तालुक्यातील चिकणी, सायखिंडी, निमगाव भोजापूर, वेल्हाळे आदी गावांना पिण्यासाठी पाणी जाणार असल्याने आढळा परिसरातील शेतकर्‍यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. यासाठी आढळा परिसरातील गणोरे, डोंगरगाव, हिवरगाव आंबरे, पिंपळगाव निपाणी, वीरगाव व देवठाण या गावांमधून तीव्र विरोध होत आहे. यासाठी डोंगरगाव व देवठाण येथे झालेल्या बैठकीमध्ये संगमनेर तालुक्यात पाण्याचा एक थेंबही जाऊ न देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यासाठी सर्वपक्षीय मोठे आंदोलन उभे करणार असल्याचे ठरविण्यात आले.

संगमनेर तालुक्यातील गावांना पिण्याचे पाणी देण्यास आमचा विरोध नाही, परंतु भविष्यात पाऊस वेळेवर न झाल्यास शेतीसाठी पाणी कमी पडू शकते. कमी येणार्‍या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन बिताका सारखा प्रकल्प लवकरात-लवकर पूर्ण करून पर्यायी पाण्याची व्यवस्था करावी. आढळाचे ओव्हर फ्लोचे पाणी संगमनेर तालुक्यात साठवून पिण्यासाठी द्यावे, अन्यथा आढळा धरणातून संगमनेर तालुक्यातील गावांना पाणी देण्यास आढळा खोर्‍यांतील ग्रामस्थांचा विरोध असणार आहे.

सीताराम गायकर म्हणाले, पाण्यासाठी कायमच विरोध करावा लागत आहे. न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी रुपरेषा ठरवली जाईल. यासाठी आढळा लाभधारकांच्या पाठीशी आम्ही भक्कम उभे राहू. जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे म्हणाले की, आढळा लाभधारकांचा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. धरणग्रस्तांचे पुनर्वसन वीरगाव, हिवरगाव व डोंगरगाव येथे झाले ते संगमनेरमध्ये झाले नाही. आधी जास्तीच्या पाण्याची उपलब्ध करा, मगच पाणी न्या, असे सांगितले. डॉ. अजित नवले म्हणाले, पाण्यासाठी विरोधाचा प्रश्न नाही, अशाप्रकारे पाणी खाली जात राहिले, तर आढळा लाभक्षेत्राचे काय? आढळात पाणी कसे वाढेल याचा विचार करा, मग खुशाल पाणी घेऊन जा.

डोंगरगाव येथील बैठकीत सरपंच बाबासाहेब उगले, विकास शेटे, सुरेश नवले, महेश नवले, तुषार आंबरे, अनिल आंबरे, शुभम आंबरे, शांताराम वाकचौरे, जालिंदर बोडके आदींनी भाषणात संगमनेरला पाणी जाऊ देण्यास विरोध केला. यासाठी अकोले तालुक्यातील सर्व पक्षीय प्रतिनिधींनी कंबर कसल्याचे दिसत आहे. यावेळी लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डोंगरगाव (ता. अकोले) शिवारात अचानक पाणी योजनेचे पाईप येऊन पडले आहे. हे पाणी गेल्याने भविष्यात शेतीसाठी व पिण्यासाठी पाण्याची टंचाई भासणार आहे.

वेळप्रसंगी आंदोलन तीव्र करू : आ. लहामटे

आढळा परिसरातील गणोरे, डोंगरगाव, हिवरगाव आंबरे, पिंपळगाव निपाणी या गावांसाठी आढळा धरणाचे पाणी महत्त्वाचे आहे. त्यामुळे इतर तालुक्यातील गावांना पाणी देण्याचा प्रश्नच नाही. शेतकर्‍यांच्या हक्कासाठी वेळप्रसंगी हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा आ. डॉ. किरण लहामटे यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news