ठाणे : मुरबाडमध्ये नवसाला पावणाऱ्या राजाचे विशेष महत्त्व | पुढारी

ठाणे : मुरबाडमध्ये नवसाला पावणाऱ्या राजाचे विशेष महत्त्व

मुरबाड; बाळासाहेब भालेराव-राजध्यक्ष : गणपतीची स्थापना घरोघरी, मंडपात केली जाते. परंतु एखाद्या शासकीय कार्यालयात गणपती बाप्पा विराजमान होत असल्याची घटना क्वचितच घडते. मुरबाडमधील मोठा गणपती याला अपवाद ठरला आहे. १९३० साली ब्रिटिश साम्राज्यात या गणपतीची प्रतिष्ठापना मुरबाड तहसीलदार कार्यालयात करण्यात आली होती. या कार्यालयात कामाला असलेले कणोजे व त्यांचे सहकारी विष्णु सीताराम जाधव, मोरू कळण, रामचंद्र गोरे, दगडू जाधव आदींनी गणपती उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. तेथे पंधरा वर्षे हा उत्सव साजरा करण्यात येत होता.

त्यानंतर ब्रिटिश राजवटीतील त्यावेळच्या कलेक्टरांना वाटले की, गणेशोत्सवामुळे लोक संघटित होतील म्हणून गणपती तेथून हलविण्यास सांगितले. हा गणपती मुरबाडमधील ताड आळी येथील कानोजे यांच्या घरी स्थापना करण्यात आली. मात्र त्यांचे घरातील जागा अपुरी असल्याने १९५७ पासून विष्णु सीताराम जाधव यांच्या घरी या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे.

मामलेदार कार्यालयातील कर्मचारी, व्यापारी वर्गणी देत व त्यातून खर्च भागवत. तेव्हा पाच दिवस गणपती उत्सव साजरा केला जात होता. मुरबाड गावात या गणपतीची मूर्ती सर्वात मोठी असल्याने त्याचे नाव मोठा गणपती असे पडले. त्यावेळी मुरबाड कोर्टाचे न्यायाधीश, मामलेदार, पोलीस निरीक्षक, डॉक्टर असे सर्व तालुका स्तरावरील वरिष्ठ अधिकारी दर्शनासाठी येत असत.

परिसरात नवसाला पावणारा गणपती अशी त्याची महती आहे. गावातील लोक स्वतःहून त्यासाठी वर्गणी देतात. सार्वजनिक मोठा गणेशोस्तव मंडळ मुरबाड तर्फे गणेश चतुर्थी ते एकादशी असे सात ते आठ दिवस हा उत्सव साजरा केला जातो. भजन, कीर्तन, महिला मंडळाचे कार्यक्रम येथे सादर होतात. या गणपती उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक दर्शनासाठी येतात. तसेच मुरबाडमध्ये नवसाला पावणारा पावणाऱ्या राजाचं विशेष महत्त्व आजही दिसून येत आहे. त्यामुळे राजाच्या दर्शनासाठी मुरबाड परिसरातील तसेच ग्रामीण भागातून भक्त भाविक दर्शनासाठी येत असतात. गणेश विसर्जनाच्या अगोदर एक दिवस येथे सत्यनारायणाची पूजा होते. त्यावेळी लाडू व पेढ्याचा प्रसाद सर्व भाविकांना वाटला जातो. लोकवर्गणीतून हा खर्च करण्यात येतो दिलीप जाधव कुटुंबाच्या घरी गणपती बसतो. मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ जाधव तर चिटणीस सुरेश म्हात्रे आहेत.

हेही वाचा

Back to top button