काही लोकांना ते हजम होत नाही; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला | पुढारी

काही लोकांना ते हजम होत नाही; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : आजही काही लोकं म्हणतात, हे सरकार राहणार नाही. मात्र, हे सरकार सर्वसामान्य लोकांचे आहे, त्यामुळे ते टिकणारच, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला दिले. काही लोकांना ते हजम होत नाही. घशाखाली उतरत नाही की, एकनाथ शिंदे कसा हा डोलारा सांभाळतील. मात्र, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मला सरकार चालविताना कोणतीही अडचण येणार नाही. सर्वसामान्य जनतेला न्याय देणे, हाच आमचा अजेंडा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शक्तीस्थळावर जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी आनंद दिघे यांना अभिवादन केले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आनंद दिघे शरीराने नसले तरी मनाने आपल्यासोबत असल्याची प्रचिती येते. जिल्ह्यात त्यांनी अलौकिक कार्य केले. त्यांच्यावरील सिनेमात त्यांचा सर्व जीवनपट उघडू शकत नाही. त्यांचा त्याग आपण पहिला. बाळासाहेबांचं हिंदुत्व त्यांनी पोहोचवले आणि त्याची पोचपावती जनतेने दिली. त्यांचं आपल्यातून निघून जाणं ही वेदना आहे. आपण जो इतिहास घडवला, त्यामागे त्यांचीच प्रेरणा आहे. कठीण अशी लढाई लढलो. हितचिंतक आणि राजकारणी लोकांना त्यावेळी धास्ती वाटली. मात्र, लढाई साधी नव्हती, पण जिंकलो. दिघेंचं स्वप्न होतं की ठाण्याचा मुख्यमंत्री होईल आणि ते स्वप्न पूर्ण झाले. मला अभिमान आणि समाधान आहे, माझ्या गुरूच्या आशीर्वादाने पल्ला गाठला. या सरकारने दीड महिन्यात ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. मोठ्या निर्णयांची जंत्री असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button