ठाणे : ‘बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा वारसा कोण पुढे नेत आहे हे जनता निवडणुकीतून दाखवेल’ | पुढारी

ठाणे : 'बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा वारसा कोण पुढे नेत आहे हे जनता निवडणुकीतून दाखवेल'

ठाणे : पुढारी वृत्तसेवा; बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा खरा वारसा कोण पुढे नेत आहे हे जनताच निवडणुकीतून दाखवुन देईल असे खुले आव्हान खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. स्वर्गीय आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शक्ती स्थळावर दिघे यांना अभिवादन करण्यासाठी राजन विचारे तसेच आनंद दिघें यांचे पुतणे केदार दिघे या ठिकाणी आले होते. त्यांच्या सोबत महिला आघाडी प्रमुख अनिता बिर्जे देखील उपस्थित होत्या.

संपूर्ण महाराष्ट्रात शिंदे विरुद्ध ठाकरे गट असे चित्र निर्माण झाले आहे. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर पकड असून आता या ठिकाणी ठाकरे गटाच्या माध्यमातुन खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले आहे. आनंद दिघें यांच्या पुण्यतिथी निमित्त एकनाथ शिंदे हे शक्तीस्थळावर अभिवादन करण्यासाठी येणार असून, त्यापूर्वी खासदार राजन विचारे आणि दिघें यांचे पुतणे केदार दिघे यांनी या ठिकाणी येऊन आनंद दिघे यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी शिंदे गटावर टीका केली.

बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्याचा विकास झाला आहे, त्यामुळे विकास कोणाच्या नेतृत्वाखाली झाला आहे हे पाहणे देखील महत्वाचे आहे. शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघें यांचा वारसा पुढे नेत असल्याचे सांगितले जात असले, तरी आनंद दिघे कोणाच्या हृदयात आहेत ते लवकरच समजेल. नुसता फोटो लावून होत नाही. फोटो हे काल्पनिक असतात. मात्र खरा वारसा कोण पुढे नेत आहेत हे लवकरच जनताच निवडणुकीत दाखवून देईल असे खुले आव्हानच त्यांनी शिंदे गटाला यावेळी दिले.

हेही वाचा :  

Back to top button