कोकेन विक्री करणाऱ्या आफ्रिकन नागरिकास अटक, २४ लाखांचे कोकेन जप्त | पुढारी

कोकेन विक्री करणाऱ्या आफ्रिकन नागरिकास अटक, २४ लाखांचे कोकेन जप्त

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : अमली पदार्थाच्या तस्करीत सर्वाधिक सहभाग हा नायझेरीयन व रिपब्लिक ऑफ आयवोरी कोस्ट या विदेशी नागरिकांचा असल्याचे पोलीस तपासात वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. दरम्यान वागळे स्टेट परिसरातून कोकेन ड्रग्ज विक्री करण्यास आलेल्या एका आफ्रिकन नागरिकास ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिटच्या पथकाने बुधवारी रात्री अटक करण्यात आली. या आफ्रिकन नागरिकाकडून तब्बल २४ लाख रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले.

हा विदेशी नागरिक आपल्या साथीदारसंह मुंबई व ठाणे परिसरात अमली पदार्थ तस्करी व विक्रीचे काम करत होता, अशी माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे. कोफी चार्लस उर्फ किंग (साकिनाका, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आफ्रिकन नागरिकाचे नाव आहेत. ठाण्यातील वागळे स्टेट परिसरात एक विदेशी नागरिक ड्रग्ज विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिटच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर नगर येथील हिंदुस्थान रेसिडेन्सी हॉटेल जवळ रस्त्यावर सापळा लावून एका आफ्रिकन नागरिकास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ६० ग्रॅम कोकेन ड्रग्ज आढळून आले.

पोलिसांनी हे ड्रग्ज जप्त करीत आफ्रिकन नागरिकास अटक केली. त्याच्याकडे आफ्रिकन देशाचा पासपोर्ट, व्हिजा आढळून आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी दिली. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत २४ लाख रुपये इतकी आहे. अटक करण्यात आलेला आफ्रिकन नागरिक आपल्याच देशातील इतर साथीदारांच्या मदतीने मुंबई, ठाणे परिसरात ड्रग्ज विक्री करीत होता. त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी वागळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button