भिवंडी बनले एक्स्पायरी उत्पादनांचे विक्री केंद्र | पुढारी

भिवंडी बनले एक्स्पायरी उत्पादनांचे विक्री केंद्र

भिवंडी : संजय भोईर भिवंडी ग्रामीण भागातील फोफावलेल्या गोदाम पट्ट्यातील मुदतबाह्य एक्सपायरी झालेल्या जीवनावश्यक वस्तू, खाद्य पदार्थ बाहेर काढला जात असताना त्यांची भंगारात खरेदी करून भिवंडी शहरातील झोपडपट्टी विभागात सर्रासपणे विक्री करून सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यशी खेळ सुरू आहे. तर या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन कोणतीही कारवाई अशा विक्री केंद्रांवर करीत नसल्याने या उद्योगातील लाखो रुपयांची उलाढाल बिनदिक्कत सुरू आहे हे विशेष.

भिवंडी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे गोदाम आहेत. त्यामध्ये देशभरात वितरीत केला जाणार्‍या वस्तू साठविल्या जातात. जीवनावश्यक वस्तू, सौदर्य प्रसाधने, खाद्य पदार्थ चॉकलेट अशा सामुग्रीचा मोठा समावेश आहे. परंतु या गोदामात अनेक ठिकाणाहून विक्री न झाल्याने माघारी आलेला माल गोदामात पडून राहिल्याने अखेर मुदातबाह्य झाल्याने त्याची व्हिलेवाट लावण्यासाठी मार्ग अवलंबला जातो तो भिवंडी शहरातील झोपडपट्टी विभागातून विक्री करण्याचा. या गोदामातील वस्तू भंगार विक्रेते घाऊक भावात किलोच्या भावात खरेदी करून अर्ध्या किमती मध्ये विक्री केला जातो.

भिवंडी शहरातील शांतीनगर, गैबीनगर, खंडू पाडा, तीनबत्ती, ईदगाह रोड, भंडारी कंपाऊंड, विठ्ठल नगर, खडक रोड व शहरा नजीकच्या खोणी, खाडीपार, काटई या भागात विक्रीची दुकाने सर्रास थाटली जातात.त्यांचा व्यवसाय तेजीत असून कालबाह्य वस्तूंची खरेदी-विक्रीही जोरात सुरू आहे. या दुकानांमध्ये खाद्यपदार्थ आणि मोठ्या प्रमाणात सौंदर्यप्रसाधने आणि रसायने पुरवली जातात. परंतु मुदातबाह्य झालेला साठा जमिनीत गाडून नष्ट करणे गरजेचे असताना या मालाच्या खरेदी विक्री व्यवहारातील माफिया टोळीतील व्यक्ती अशा कंपन्यांचे गोदाम हेरून तेथील डम्पिंग माल उचलतात, त्यावरील पॅकेजिंग आणि तारीख या गोष्टी मिटवून त्याची विक्री सुरू होते. हे सर्व व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीर असून या उत्पादनां मध्ये टूथपेस्ट, खाद्य व केसांचे तेल, साबण, चॉकलेट, वेफर्स, पेय, सरबत, ब्रँडेड कंपनीचे स्नॅक्स, पावडर यांचा समावेश आहे.

अन्न व औषध प्रशासनाकडून तक्रारींकडे दुर्लक्ष

बर्‍याच वेळा या चॉकलेट मध्ये किडे सुध्दा आढळून आले आहेत. या मुदत संपलेल्या वस्तूंची बेकायदेशीर खरेदी-विक्री करणार्‍या माफियांवर कठोर कारवाई करून लोकांच्या आरोग्याशी सुरू असलेली खेळ बंद करावा अशी मागणी सुरू असताना अन्न व औषध प्रशासना कडून या तक्रारीं कडे सोयीस्कर पणे दुर्लक्ष करीत असल्या बद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा

Back to top button