

ठाणे पुढारी वृत्तसेवा : शिवसेना आमदारांच्या बंडाने राज्यातील राजकारण ढवळून निघत असताना शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख, विभागप्रमुखांना भावनिक हाक घालत थेट नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पहिल्यांदा लक्ष केले. सेनाभवनातील या बैठकीला ठाणे जिल्ह्यातील पाच जिल्हा प्रमुखांपैकी एकाच जिल्हाप्रमुखाने हजेरीलावल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे आमदार, खासदार, माजी नगरसेवकांनी शिंदे यांना पाठिंबा दिला असताना जिल्ह्यातील काही प्रमुख ज्येष्ठ शिवसैनिक खुलेआमपणे कोणतीही भूमिका घेत नसल्याचे दिसून येते. तर जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका बरखास्त झाल्याने प्रमुख पदाधिकारी, इच्छुक उमेदवार हे ठाकरे की शिंदे यांची खुलेआम निवड करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. त्याचवेळी शिवसेनेचे चिन्ह मिळाले नाही तर शिंदे गटाकडून आनंद सेना अथवा धर्मवीर सेना उदयास येऊ शकते, अशी ठाण्यात जोरदार चर्चा रंगली आहे.
शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीविरोधात बंड पुकारत एकच खळबळ उडवून दिली आहे. थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिल्यानंतर त्यांची देशपातळीवर दखल घेण्यात आली. काही खासदारही फुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुमारे 50 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिंदे यांच्या गटाकडून केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार वाचविण्यासाठी प्रयन्त सुरू करताच राजकीय घडामोडींना अधिक वेग आला आहे.
ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि निष्ठावान, जुने शिवसैनिक अशी भावनिक हाक घातल्याने वातावरण बदलू लागले आहे. या पार्श्वभूमीवर कोणती भूमिका घ्यायची या संभ्रमात ठाणे जिल्ह्यातील शिवसैनिक आहेत. ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांनी थेट भूमिका घेत एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे जाहीर केले. त्यांच्या समर्थनार्थ ठाण्यात होर्डिंग्ज, पोस्टर लागले असून प्रत्येकाच्या व्हॉटसअॅपच्या स्टेटसवर शिंदे यांचे फोटो, व्हिडिओ आहेत. सोशलमीडियावर फक्त शिंदे दिसत असल्याने ठाणेकर हे शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत.
61 माजी नगरसेवक हे शिंदे गटात सामील होतील, चार माजी नगरसेवकांनी ठाकरे आणि शिंदे या दोघांचेही फोटो लावले नसल्याचे काही होर्डिंग्ज ठाण्यात झळकत आहेत. यातून बरेच काही संकेत मिळत आहेत. शाखा प्रमुख, विभाग प्रमुख आणि जिल्हा प्रमुख हे शिंदे यांच्यासोबत असून जिल्ह्यातील अन्य प्रमुख पदाधिकारी आणि इच्छुक उमदेवारांनी कोणा एकाच्या विरोधात भूमिका घेण्याचे टाळले असल्याचे दिसून येते. बंड थंड होऊन ठाकरे- शिंदे एकत्र आले तर आमचे काय होईल, अशी ही भीतीयुक्त प्रतिक्रिया काही पदाधिकार्यांकडून विशेष: ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येत आहे.
शिंदे गट स्वतंत्र झाल्यास ठाणे, कल्याण महापालिकेवरील शिवसेनेची सत्ता जाईल, असेच राजकीय चित्र आहे. अंबरनाथ-बदलापूर महापालिकेत संमिश्र चित्र असेल. नवी मुंबई महापालिकेत भाजपची निर्विवाद सत्ता येईल. भिवंडीत मात्र खिचडी सरकार स्थापन होईल. उल्हासनगर महापालिकेत पुन्हा एकदा राष्ट्रवादीला संधी मिळू शकते, भाजपच्या नगरसेवकांची संख्या वाढेल. वास्तविक राज्यातील राजकीय गणित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय समीकरणे वेगळी असल्याने बंडाचा फटका शिवसेना, शिंदे गट यांना बसून भाजपला फायदा होऊ शकतो, असे सध्याचे चित्र आहे.
हेही वाचा