आज प्रसिद्ध होणार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या | पुढारी

आज प्रसिद्ध होणार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या

ठाणे पुढारी वृत्तसेवा : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या दिनांक 23 जून 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून नागरिकांकडून दिनांक 23 जून ते 01 जुलै, 2022 या कालावधीत हरकती व सूचना मागविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी आज दिली आहे.

नागरिकांना ठाणे महापालिकेच्या प्रभागांच्या प्रारुप मतदार याद्या www.thanecity.gov.in या वेबसाईटवर आणि निवडणूक विभाग (मुख्यालय) आणि सर्व प्रभाग समिती कार्यालये येथे पाहण्यासाठी प्रसिध्द करण्यात येणार आहेत. मा. भारत निवडणूक आयोगाने प्रसिध्द केलेली व दिनांक 05 जानेवारी, 2022 ते दिनांक 31 मे, 2022 पर्यंत अद्ययावत केलेली विधानसभा क्र. 144 कल्याण ग्रामीण, 146 ओवळा-माजिवडा , 147 कोपरी पाचपाखाडी, 148 ठाणे व 149 मुंब्रा – कळवा या विधानसभेच्या मतदार याद्या ठाणे महानगरपालिका प्रभाग रचनेनुसार मतदारांचे विभाजन प्रभागनिहाय विभागून ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या दिनांक 23 जून, 2022 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

दरम्यान दिनांक 23 जून, 2022 ते दिनांक 01 जुलै, 2022 या कालावधीत नागरिकांकडून सदर प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. यामध्ये लेखनिकांच्या काही चुका असल्यास त्या सुधारणे, दुसर्‍या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झाले असल्यास ते वगळणे, संबंधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत नाव असूनही, महानगरपालिकेच्या संबंधित प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नावे वगळण्यात आली असल्यास अशा मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे आदीबाबत हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत.

मुदतीत हरकती व सूचना द्या!

नागरिकांच्या लेखी हरकती व सूचना महापालिकेच्या संबंधित प्रभाग समिती कार्यालयात विहीत मुदतीत कार्यालयीन वेळेत स्वीकारण्यात येतील. वरील नमूद मुद्यांव्यतिरिक्त अन्य मुद्यांवरील हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार नाहीत. तसेच उपरोक्त मुद्याव्यतिरिक्त आणि मुदतीनंतर दाखल झालेल्या हरकती व सूचना विचारात घेतल्या जाणार नसल्याने नागरिकांनी मुदतीत आपल्या हरकती व सूचना दाखल कराव्यात.

हेही वाचा

Back to top button