नगर : ‘पंचायत राज’चा दौरा लांबणीवर? | पुढारी

नगर : ‘पंचायत राज’चा दौरा लांबणीवर?

नगर : पुढारी वृत्तसेवा: पंचायत राज समिती 28 जूनपासून नगर दौर्‍यावर येत असल्याने जिल्हा परिषदेने सर्व तयारी केलेली आहे. समिती सदस्यांच्या दिमतीसाठी प्रशासनाने 9 समित्या स्थापन केल्या असून, त्यामध्ये 9 विभागप्रमुख आणि 67 कर्मचार्‍यांचा लवाजमा आहे. प्रवास, निवास आणि अन्य आवश्यक सोयीसुविधांसाठीही विशिष्ट यंत्रणा उभी केली आहे. मात्र, राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडी आणि त्यात पंचायत राज समितीचे अध्यक्षांसह अन्य आमदारांंचा असलेला सहभाग पाहता नगरचा हा दौरा लांबणीवर पडण्याची चर्चा आहे.

दि. 28 ते 30 जून या कालावधीत पंचायत राज समिती नगर दौर्‍यावर येणार आहे. शिवसेनेचे डॉ. संजय रायमूलकर हे या 32 आमदारांच्या समितीचे अध्यक्ष आहेत. समिती येणार असल्याने सीईओ आशिष येरेकर, अतिरिक्त सीईओ संभाजी लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर आदींनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे आवश्यक अहवाल बनवले आहेत.
यामध्ये सन 2017-18 वार्षिक लेखे, प्रशासन अहवालाचे बुकलेट तयार आहेत.

समितीतील काही आमदारांना ते पोहचही केले आहेत. याशिवाय नगरला आल्यावर समितीच्या निवासाची, प्रवासाचीही चोख व्यवस्था केलेली आहे. त्यासाठी 9 समित्यांची स्थापना केलेली आहे. यामध्ये स्वागत, निवास, प्रवास, भोजन, अल्पोहाराच्या व्यवस्थेची कर्मचार्‍यांवर जबाबदारी देण्यात आलेली आहे.

दरम्यान, प्रत्येक समितीत विभागप्रमुखांच्या मार्गदर्शनात 7-8 कर्मचार्‍यांचा समावेश करण्यात आलेला आहे. संबंधित कर्मचार्‍यांवर टेबल व्यवस्थेपासून ते रात्री भोजन, निवास व्यवस्थेचीही जबाबदारी आहे. अशाप्रकारे जिल्हा परिषदेने पंचायत राज’च्या ‘मेहमाननबाबीची’ जय्यत तयारी केली आहे. मात्र, दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडी, बंडखोर आमदारांमध्ये समितीचे अध्यक्ष रायमूलकर यांच्यासह अन्य आमदारांना सहभाग, अस्थिर सरकार इत्यादी कारणांमुळे 28 तारखेला येणारी समिती दौरा लांबणीवर पडणार असल्याची चर्चा आहे.

किंबहूना सरकार कोसळलेच, तर ही पंचायत राजची समितीही बरखास्त होणार आहे. त्यामुळे झेडपी प्रशासनाने तूर्ततरी काहीसा सुटकेचा नि:श्वास सोडल्याचे चित्र आहे. दौरा पुढे ढकलला किंवा रद्द केला, तर समितीतील राष्ट्रवादी, काँग्रेसच्या आमदारांचा मात्र भ्रमनिरास होणार आहे.

राज्य सरकारच्या घडामोडींकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष लागले आहे. काही अधिकार्‍यांनी हा दौरा लांबणीवर पडू शकतो, असा अंदाज वर्तवला आहे, तर काही अधिकार्‍यांनी मात्र आता तयारी झालीच आहे, तर एकदाची समिती येऊन जावी, असे मत व्यक्त केले आहे.

Back to top button