नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची ‘ही’ आहेत प्रमुख तीन कारणे | पुढारी

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची 'ही' आहेत प्रमुख तीन कारणे

ठाणे; पुढारी वृत्तसेवा: उदरनिर्वाह करण्यासाठी साताऱ्याहून ठाण्याला आलेल्या एका तरुणाने रिक्षा चालवत असताना शिवसेनेचा भगवा झेंडा खाद्यावर घेतला आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रभावाखाली काम करीत शाखा प्रमुखाची जबाबदारी स्वीकारली. चाळीतील छोट्याश्या खोलीत राहणारा हा तरुण मंत्री एकनाथ शिंदे पुढे नगरसेवक बनले, सभागृह नेतेपदी नियुक्ती झाली आणि त्यांच्या राजकीय जीवनाला कलाटणी मिळाली.

वजनदार खाते मिळू शकले नाही

आनंद दिघे यांनी दिलेली जबाबदारी यशस्वी केल्याने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यातून आमदारकीची उमेदवारी दिली. आमदार बनलेले एकनाथ शिंदे हे पुढे ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून काम करू लागले. दिवसरात्र शिवसेना संघटना वाढविण्यासाठी कष्ट करणाऱ्या शिंदे यांनी ठाणे महापालिकेवर एक हाती सत्ता मिळवून दिली. शिंदे यांचा प्रवास राज्याच्या राजकारणात झाला. म्हणता -म्हणता एकनाथ शिंदे हे सगळ्यांचे भाई म्हणून शिवसैनिकांना आपलेसे वाटू लागले. भाजपची सत्ता आली आणि शिंदे यांची मंत्रीपदी वर्णी लागली. मात्र, त्यांना शिवसेनेच्या गोटातून वजनदार खाते मिळू शकले नाही.

शिंदे यांच्या विरोधात शिवसेनेतील दुसरा गट सक्रिय झाला आणि त्यांना शह देण्याचा प्रयत्न करत होता. त्यातून एमएसआर डी. सी. मंत्री म्हणून मर्यादित ठेवण्यात आले. त्यांची नाराजी ओळखून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्याकडे मुंबई नागपूर समृदी महामार्ग याचे काम सोपविले आणि शिंदे यांच्या कामाचा वेग संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. युती सरकार गेले आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या.

मुख्‍यमंत्री आजारी असताना शिंदे यांना डावलले

भाई हे मुख्यमंत्री होणार अशीच राजकीय वातावरण होते. महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी मुख्यमंत्री पदी उध्दव ठाकरे यांना आग्रह केला आणि उद्धव यांच्या रूपाने पहिले ठाकरे मुख्यमंत्री झाले. नगरविकास खात्याची जबाबदारी शिंदे यांच्याकडे देऊन दोन क्रमांकाचा नेता म्हणून शिंदे यांची पकड मजबूत होऊ लागली. मात्र काही महिन्यात शिंदे यांचे पंख छाटण्यास सुरुवात झाली. मुख्यमंत्री आजारी असताना शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री यांचा कारभार सोपविला जाईल, असे वाटत असताना पुन्हा त्यांना डावलण्यात आले.

शिवसेनेच्या अनेक नेत्यांची ईडी चौकशी सुरू आहे. शिवाय, आगामी निवडणुकीत हिंदू मतांचे विभाजन झाले तर आपल्या जागा अडचणीत येतील, ही भीती अनेक शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखविली आहे. हे लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पुढे करून भाजपसोबत जाण्याचे मन बनविले असावे, अशी चर्चा आहे.

राज्‍यसभा- विधान परिषद निवडणुकीतही शिंदे यांच्‍यावर अविश्‍वास

अशी तीन वेळा नाराजी असताना राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत शिंदे यांना बाजूला ठेवून त्यांच्यावर अविश्वास दाखविण्यात आला. त्यांच्या मंत्रालयातील फाईल्स देखील सीएम कार्यालयात मागवून घेतल्या जात होत्या. ठाकरे यांच्या निकटवर्तीय हे शिंदे यांची ताकद कशी कमी होईल, त्यांना मातोश्रीवरून कसे दूर केले जाईल, याबाबत बरेच काही शिजवत होते, अशी चर्चा होती. शिवसेना आमदारांना फार महत्व दिले जात नव्हते, महाविकास आघाडी सरकारमध्ये निधीवाटपात डावलले जात असल्यामुळे अनेक शिवसेना आमदार नाराज आहेत, त्यांनी शिंदे यांच्याकडे आपले दु:ख बोलून दाखविले आहे. यापैकी बहुतेक आमदार शिंदे यांच्या समवेत आहेत. नाराजीचा राजकीय भूकंप झाल्याचे दिसून येते, असल्‍याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीतील घडामोडींमुळे खुद्द उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर नाराज आहेत. पडद्याआडून झालेल्या घडामोडींचा या निवडणुकांवर परिणाम झाला आणि अनपेक्षित निकाल आले. त्यामुळेही भाजपसोबत जाण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी विचार केला असावा, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात  रंगली आहे.

हेही वाचलंत का?  

Back to top button