अजिंठा : पावसाची दडी, खरिपाची पिके कोमेजली | पुढारी

अजिंठा : पावसाची दडी, खरिपाची पिके कोमेजली

अजिंठा, पुढारी वृत्तसेवा : सिल्‍लोड तालुक्यातील अजिंठा परिसरात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके सुकू लागल्याने शेतकरी हताश झाले आहेत. मशागतीची कामे आटोपून खरीप पेरणीची तयारी केलेले शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत, मात्र पावसाने अद्याप दमदार हजेरी लावली नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. त्यात कधी कडक ऊन तर कधी ढगाळ वातावरण होत आहे.

उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पिके सुकण्यास सुरुवात झली असून पाऊस नसल्याने खरिपातील पीक धोक्यात आल्याचे चित्र सध्या परिसरात पाहायला मिळत आहे. परिसरात खरीप हंगामाच्या पहिल्या टप्प्यात साधारणतः दहा टक्क्यांच्या आसपास खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या होत्या. त्यात काही शेतकर्‍यांनी धूळपेरण्याही केल्या होत्या. मात्र पावसाने तब्बल आठ दिवस विश्रांती घेतल्याने पिके सुकू लागली आहेत.

याच कालावधीनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात झाला. या पावसावर शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या आहेत. सोयाबीन, मका, कपाशी, मूग व अन्य पिकांची पेरणी केली. सध्या पिके अंकुरली असून कोरडवाहू जमिनीतील पिकांची अवस्था बिकट आहे. शेतकर्‍यांनी ठिबकवर पाणी द्यायला सुरवात केली; परंतु विहिरींचा साठा अत्यल्प असल्याने सर्व काही पावसावर अवलंबून आहे. त्यात परिसरातील नदीनाले अद्याप कोरडेठाक आहेत.

पुढील चार दिवसांत पाऊस पडला नाही, तर शेतकर्‍यांसामोर दुबार पेरणीचे संकट निर्माण होणार आहे. पाण्याअभावी पिके सुकू लागली आहेत. आठ दिवसांपासून पावसासाठी अनुकूल वातावरण आहे. आकाशात ढग येतात; पण पाऊस काही पडत नाही . पावसाने दडी मारल्याने सिल्‍लोड तालुक्यातील अजिंठा, अनाडा, बाळापूर, गोळेगाव, पिंपळदरी, सराटी, बोधवड, पानस, डिग्रस, धोत्रा, पानवडोद, शिवना, मादणी, आमसरी, वाघेरा, नाटवी, खुपटा, जळकी परिसरातील खरिपाची पिके सुकू लागली आहेत.

कपाशीसह अन्य पिकांची उगवण व्यवस्थित होत नाही. त्यात मका, सोयाबीन, तूर आदी पिकेसुकू लागली आहेत. दुबार पेरणीच्या संकटामुळे शेतकरी धास्तावले आहेत. पावसाअभावी अनेक मंडळांतील पेरणीही रखडलेलीच आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

Back to top button