डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : पत्नी वारंवार फोनवर बोलत असल्याने तिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन पतीने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. आणि पत्नीच्या गुप्तांगावर बियरच्या बाटलीने जखमा करून खून केल्याची घटना घडली होती. ही घटना शहापूर तालुक्यातील बिरवाडी परिसरात घडली होती. याच गुन्ह्यातील आरोपी पतीला पत्नीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवत कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. संतोष शेळके असे आरोपीचे नाव आहे.
मृत सुनीता संतोष शेळके (वय ४०) हिचा विवाह १९९४ साली बिरवाडीत राहणाऱ्या आरोपी संतोषशी झाला होता. २०१७ पासून पती कामधंदा करीत नव्हता शिवाय त्याला दारूचे व्यसन जडले होते. त्यामुळे मृत पत्नीवर २०१८ पासून कुटुंबाच्या पालनपोषण करण्याची जबाबदारी आली. त्यामुळे ती बिरवाडीजवळच असलेल्या एका भगर मिलमध्ये कामाला जात होती.
ती कामानिमित्त फोनवर बोलत हाेती, मात्र आपल्याला बघून पत्नी फोन बंद करते असा संशय आरोपी पतीच्या मनात होता. या कारणास्तव ताे तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच संशयातून त्याने ३० एप्रिल २०१८ रोजी पत्नीला काही बहाण्या निमित्त दुपारच्या सुमारास गावाजवळच्या सिमेंटच्या पाइपाजवळ बोलवून तिच्याशी दोन वेळा शरीर संबंध ठेवले. त्यानंतर बियरच्या काचेच्या बाटली फोडून तिच्या गुप्तांगाच्या भागावर जखमा करून तिच्याच साडीने गळा आवळून तिचा खून केला. आणि त्यानंतर संतोषनेच त्या रात्री घरी पत्नी आली नसल्याचा कांगावा केला.
सुनीताचा मृतदेह गावाजवळच्या सिमेंटच्या पाइपाजवळ आढळून आला. त्यानंतर शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत मृतक भावाच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने जन्मठेपेची व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना कारावास अशी शनिवारी (दि.४) शिक्षा सुनावली.