Ketaki Chitale | शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट भोवणार, अभिनेत्री केतकी चितळेवर गुन्हा दाखल - पुढारी

Ketaki Chitale | शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट भोवणार, अभिनेत्री केतकी चितळेवर गुन्हा दाखल

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

आपल्या वादग्रस्त पोस्टमुळे नेहमीच चर्चेत राहणारी मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली आहे. या प्रकरणी केतकी चितळेवर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवा पोलिसांनी कलम 500, 505(2), 501 आणि 153 A हा गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद नोंदवली आहे.

केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने राजकीय व प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या संबधांने बदनामीकारक पोस्ट केली. यामुळे आमच्या पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये भावनिक व तीव्र नाराजीची भावना निर्माण झाली आहे. अशा पोस्टमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच केतकी चितळेने ही पोस्ट करुन भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेशाची भावना, तेढ, वैमनस्य निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. या महिलेने आणखी अशा काही पोस्ट करण्याची शक्यता आहे. यामुळे या महिलेविरुद्ध तक्रार देण्यात येत आहे, असे स्वप्नील नेटके यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी केतकी चितळेवर अटकेची कारवाई होण्याची शक्यता असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Back to top button