डोंबिवली : भय इथले संपत नाही, आजही पुन्हा ५ जीव घेणाऱ्या त्याच खदानीवर धुतले कपडे | पुढारी

डोंबिवली : भय इथले संपत नाही, आजही पुन्हा ५ जीव घेणाऱ्या त्याच खदानीवर धुतले कपडे

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : पाणीटंचाईमुळे खदानीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या पोलीस पाटील सुरेश गायकवाड यांच्या घरातील पाच जणांचा बुडून अंत झाला होता. मात्र, या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत, तोच देसले पाडा या गावातील महिला आज (सोमवार) पुन्हा त्याच खदानीवर कपडे धुण्यासाठी गेल्या. त्यामुळे अजूनही गावात पाणी नसल्यामुळे कपडे धुण्यासाठी महिलांना त्या खदानीवर जाऊन जीव धोक्यात घालावा लागत आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन कधी लक्ष देणार ? असा संतप्त सवाल नागरिकांतून केला जात आहे.

या घटनेमुळे दोन दिवसापासून डोंबिवली शहरात एकच खळबळ उडाली आहे. देसले पाडा येथे राहणाऱ्या पोलीस पाटील यांची पत्नी, सून आणि तीन नातवंडं शनिवारी दुपारी कपडे धुण्यासाठी अर्धा तासाचे अंतर कापून संदप गावाजवळ असणाऱ्या खदानीवर गेले. मात्र, छोट्या मुलाचा पाय घसरला आणि त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात घरातील पाच जण दगावले. मात्र, त्यानंतर गावाला पाणी आणि आम्हाला सुरक्षा केव्हा मिळणार ? असा प्रश्न गावकऱ्यांनी व्यक्त केला होता. मात्र, या घटनेला दोन दिवस पूर्ण होत नसताना पुन्हा जीव मुठीत धरून त्याच खदानीवर कपडे धुण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे. गावात पाणीच नाही तर काय करायचं, रोजची काम कशी थांबवायची, असा प्रश्न या महिला विचारत आहेत. त्यामुळे आजदेखील इथे कपडे धुण्यासाठी महिलांना यावे लागत आहे.

ठाणे जिल्हा हा संपूर्ण मुंबईची तहान भागविणारा जिल्हा आहे. बारवी, तानसा, भातसा, मध्य वैतरणा यासारखी धरणे ठाणे जिल्ह्यात बांधली गेली. त्यानंतर संपूर्ण मुंबई या धरणातून आलेले पाणी पीत असली. तरी ठाणे जिल्हा मात्र अद्यापही पाणीटंचाईच्या चक्रव्यूहातून बाहेर पडू शकला नाही. किंबहुना येथील राजकीय नेते याबाबतीत अत्यंत उदासीन असल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवारी दुपारी घडलेली घटना ही डोंबिवली नजीक असणाऱ्या संदप गावात घडली. डोंबिवली शहर हे चाकरमान्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहरातील वस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्रास होणाऱ्या अनधिकृत बांधकामांच्या इमारतींना पाणीपुरवठा सहज उपलब्ध होतो. मात्र वर्षानुवर्ष आजूबाजूला राहणारे गावातील नागरिक पाण्यापासून वंचित आहेत, यासारखी दुसरी शोकांतिका नाही.

हेही वाचलंत का ?  

Back to top button