डोंबिवलीजवळ पाणीटंचाईने घेतला ५ जणांचा बळी; खदानीत २ महिलांसह ३ मुलं बुडाली | पुढारी

डोंबिवलीजवळ पाणीटंचाईने घेतला ५ जणांचा बळी; खदानीत २ महिलांसह ३ मुलं बुडाली

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : पाणीटंचाईमुळे कपडे धुण्यासाठी खदानीवर गेलेल्या एकाच कुटुंबातील दोन महिलांसोबत तीन मुलांचा पाण्यात बुडून करुण अंत झाला. नांदिवली सदिप गावच्या खदानीत शनिवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली.

नांदिवली, संदप, देसलेपाडा, भोपर या गावांत पाण्याची भीषण टंचाई असून, जिथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न तिथे कपडे धुण्यासाठी पाणी मिळण्याची शक्यताच मावळते. अशा परिस्थितीत गावाजवळच असलेल्या खदानीवर लोक धोका पत्करून कपडे धुण्यासाठी जातात. शनिवारी गायकवाड कुटुंबातील पाच जणांचा पाणीटंचाईने अखेर बळी घेतला.

मिराबाई सुरेश गायकवाड (55), अपेक्षा गौरव गायकवाड (28), मोक्ष मनीष गायकवाड (22), मयुरेश मनीष गायकवाड (8) आणि सिद्धेश कैलास गायकवाड (12) अशी मृतांची नावे आहेत.

देसले पाड्यातील गायकवाड कुटुंबीयांपैकी मिराबाई आणि अपेक्षा या दोघी शनिवारी संध्याकाळी खदानीत कपडे धुण्यासाठी गेल्या. सोबत असलेले सिद्धेश, मयुरेश आणि मोक्ष गटांगळ्या खाऊ लागले. त्यांना वाचवण्यासाठी आजी मिराबाई आणि अपेक्षा धावल्या आणि मुलांपाठोपाठ या दोघीही खोल पाण्यात बुडाल्या. अग्निशमन दलाने धाव घेत सायंकाळी उशिरा पाचही मृतदेह बाहेर काढले.

हे ही वाचलं का ?

Back to top button