उद्धव ठाकरे म्हणाले, 14 तारखेला अनेकांचे मास्क काढणार | पुढारी

उद्धव ठाकरे म्हणाले, 14 तारखेला अनेकांचे मास्क काढणार

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यात सध्या विचारांचं प्रदूषण होत आहे. विकृत विचार मांडले जात आहेत. बर्‍याच दिवसांनी मास्क काढून भाषण करतोय, मात्र 14 तारखेला अनेकांचा मास्क काढणार आहे, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला.

मुंबई महानगरपालिकेच्या सर्वांसाठी पाणी योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी गोरेगाव येथे झाला. यावेळी कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, वस्त्रोद्योग-मत्स्यव्यवसाय मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यटन पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महानगरपालिका प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्यासह सत्तारूढ शिवसेनेचे विविध नेते आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

वेगळे काही राजकीय बोलून पाणी गढूळ करणार नाही, असे सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे टोमणे मारण्याची संधी साधलीच. मुख्यमंत्री म्हणाले, एक तर काम करू द्यायचे नाही आणि केले तर भ्रष्टाचार झाला असे म्हणत ओरडत सुटायचे. राजकारण जरुर करा, पण राजकारणातही एक दर्जा असला पाहिजे. विरोधी पक्ष म्हणजे काय? नुसता विरोध करणे म्हणजे विरोधी पक्ष नाही. सरकार चुकत असेल तर जरूर कान उपटा, पण सरकार चांगलं काम करत असेल, तर कौतुक करण्याचीदेखील एक दिलदारी पाहिजे, जी आजच्या विरोधी पक्षात नाही.

आता सभेला तर सुरुवात झालेलीच आहे, 14 तारखेला तर मी सभा घेतोच आहे, पण ही सभा म्हणजे उठसूठ इकडे वार तिकडे वार असं नाही करणार, जे काय माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझं काही तुंबलेलं नाही, पण मनामध्ये ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत, असे संकेतही यावेळी दिले.

सर्वांसाठी पाणी धोरण असणारी मुंबई महापालिका पहिली आहे, याचा अभिमान वाटतो. पण, नळातले पाणी दाखवायचे नाही आणि तुंबलेले पाणी दाखवायचे, असा प्रकार सुरू आहे. मात्र, हिंदमाताला पाणी साचू नये यासाठी प्रयत्नशील असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. येत्या काळात जास्तीत जास्त इलेक्ट्रिक बस शहरात चालवणारी मुंबई महापालिका ही पहिला महापालिका असणार आहे.

मी पक्का मुंबईकर आहेच आणि एका गोष्टीचा नक्की अभिमान आहे की, मुंबईत जन्मलेला हा राज्याचा पहिला मुख्यमंत्री आहे. मी हाच विचार करत होतो की, कालच्या 1 मे रोजी संयुक्त महाराष्ट्राला 62 वर्षे झाली आणि 62 वर्षांपूर्वी माझे अजोबा त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या नेत्यांपैकी एक नेते होते. पहिल्या पाचमधील एक होते. बदलती मुंबई बघतच आम्ही मोठे झालो आहोत. तेव्हाची मुंबई कशी होती, आताची कशी आहे आणि उद्याची कशी असणार? हा एक मोठा प्रश्नच आहे.

Back to top button