आरक्षण मिळेपर्यंत भाजप देणार 27 टक्के उमेदवारी ओबीसींना : देवेंद्र फडणवीस | पुढारी

आरक्षण मिळेपर्यंत भाजप देणार 27 टक्के उमेदवारी ओबीसींना : देवेंद्र फडणवीस

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत भाजपचा संघर्ष सुरूच राहणार आहे. तोपर्यंत प्रत्येक निवडणुकीत ओबीसींना 27 टक्के उमेदवारी दिली जाईल, अशी घोषणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भाजप ओबीसी मोर्चाच्या कार्यकारिणी बैठकीत केली.

फडणवीस म्हणाले, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना राजकीय प्रतिनिधित्व मिळत होते; पण राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या हलगर्जीपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आरक्षणावर गदा आणणार्‍या या सरकारला मतदान करू नका.

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने विश्वासघाताचे राजकारण केले आहे. त्यांना ओबीसींना आरक्षण द्यायचेच नव्हते. आपली इच्छा त्यांनी पूर्ण केली आहे. जोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला ओबीसी राजकीय आरक्षणासाठी तिहेरी चाचणी पूर्ण करण्यास सांगितले आहे. त्याला दोन वर्षे पूर्ण झाली; पण या सरकारने काही केलेले नाही. त्यामुळे आता 22 महानगरपालिका, सुमारे 300 नगरपालिका, 25 जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

भाजपमधील ओबीसी नेते आपल्या कर्तृत्वाने मोठे होत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांना पोटदुखी होती. त्यामुळेच ओबीसींना आरक्षण मिळणार नाही, असाच प्रयत्न त्यांच्याकडून झाला. मुख्यमंत्र्यांनी विरोधी नेत्यांवर टीका करताना जो आक्रमकपणा दाखवला आहे, तोच आक्रमकपणा विकासकामांच्या बाबतीतही दाखवावा, असे आव्हानही पाटील यांनी दिले.

Back to top button