शहापूर : डोळ्यासमोर पाणी असूनही घागर रिकामीच; ‘थ्री फेज’ वीज नसल्याने पाणी योजना धुळीत | पुढारी

शहापूर : डोळ्यासमोर पाणी असूनही घागर रिकामीच; 'थ्री फेज' वीज नसल्याने पाणी योजना धुळीत

कसारा,(ठाणे), शाम धुमाळ : धरणांचा तालुका म्‍हणून तसेच अतिदुर्गम व संपूर्ण आदिवासी तालुका असलेला शहापूर सह्याद्री पर्वत रांगेच्या कुशीत वसलेला आहे. या तालुक्यात अप्पर वैतरणा, तानसा, भातसा सारखे मोठी धरणे आहेत. तर अजून 2 जलाशय नव्याने होत आहेत. परंतु या जलाशयाचे पाणी तालुक्यातील तहानलेल्या आदिवासी बांधवाना न मिळता थेट मुंबई, ठाण्याला जात आहे. याचा परिणाम धरणांचा तालुका असलेलेच गाव आज पाणी टंचाईने ग्रासले आहे.

शहापूर तालुक्यातील कोठारे, कळभोडे, कोथला, थड्याचापाडा , विहिगाव, माळ या परिसरात  पाणी टंचाई ही मार्च महिन्यापासूनच डोके वर काढत आहे. तर थड्याचा पाडा या गावात जानेवारीपासूनच पाणी टंचाई सुरू झाली आहे. या भागातील भातसा नदी पात्राच्या  माथ्यावर वसलेल्या थड्याचा पाडा या गावाला 3 दिशेने भातसा नदी पात्राने वेढलेले आहे. या गावांचे दुर्भीक्ष्य असे की 2 ते 3 किलोमीटर अंतरावर पाणी साठा लोकांना डोळ्याने दिसत आहे, परंतु गावात पाणी नाही. गेल्‍या चार वर्षांपूर्वी पाणी योजना मंजूर झाली आहे. परंतु विज पुरवठा कमी दाबाचा असल्याने ती योजना धुळीत पडली आहे.

वीज पुरवठयामूळे या गावात जानेवारीपासून पाणी टंचाईला सुरूवात होते. परंतु येथे शासकीय टँकर हे मार्चनंतर सुरु होतात. यामूळे स्थानिक माता भगिनीं व पुरुष मंडळी 2 ते 3 किमीचा पायी प्रवास करीत दरी चढ उतार करीत पाणी आणतात. तर मार्च नंतर या गावांसाठी टँकर सुरु होतात. गावातील विहिरीवर टँकर खाली होण्यासाठी आला की गावातील ग्रामस्थ विहिरीभोवती गराडा घालीत पाणी घेण्यासाठी गर्दी करतात. ग्रामस्थाना वापराच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्यासाठीची मोठी कसरत करावी लागते आहे.

आमदार दौलत दरोडा यांचे गाव असलेल्या कोठारे गावात देखील पाण्यासाठी ग्रामस्थांना वन-वन करावी लागत आहे. विहिरींनी तळ गाठल्याने लोकांना टँकर ची वाट बघत बसावे लागत आहे. तसेच या गावाची स्‍थितीसुद्धा अशीच आहे. गावाच्या दोन्ही दिशेस भातसा नदीचे पाणी आहे. आणि होऊ घातलेल्या मुमरी धरणाचा मार्ग देखील या गावाच्या वेशीवरुन जातोय परंतु  त्याचा उपयोग या गावांना होईल असे असे वाटत नाही. दरम्यान, या गावाप्रमाणे तालुक्यातील 50 पेक्षा अधिक गाव पाड्यात पाण्याची भीषण टंचाई जानवत आहे. तर काही ठिकाणी सुरु झालेले टँकर देखील कमी पडतात.

गावाजवळील नदीपात्र
गावाजवळील नदीपात्र

कसे केले जाते सहा महिनेपूर्वीच पाण्याचे नियोजन

कसारा पासून 5 किलोमीटर अंतरावर डोंगर कपारीत वसलेल्या उब्रावणे गावातील लोक हे दिवाळी पासून पाण्याचे नियोजन करतात. या गावात असलेल्या दोन विहिरी पावसाळ्यात भरलेल्या असतात त्यातील एक विहीर ग्रामस्थ बंद करून ठेवतात. त्यावर आवरण घालीत एक विहीर बंद करून ठेवतात. आणि एक विहीरीचे पाणी मार्च पर्यंत वापरतात. घरपट 4 ते 5 हांडे पाणी पिण्यासाठी वापरतात. तर रोजच्या वापरासाठी  छोट्या छोट्या वाहत्या नाल्याचे पाणी आणतात. मार्च महिन्यात पाणी टँकर सुरु झाले की बंद केलेली विहीर गावकरी खोलतात व त्यातील पाणी वापरणे सुरु करतात टँकरचे पाणी व विहिरीतील पाणी यांचे योग्य नियोजन करीत असल्याने ग्रामस्थाना पाण्याची झळ कमी प्रमाणात बसते.

लोकप्रतिनिधी अपयशी

दरम्यान, शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई असो किंवा अपूर्ण व निकृष्ठ रस्ते यावर सकारात्मक रित्या प्रश्न सोडवून आदिवासी माता भगिनींची पाण्यासाठी होणारी वन वन थांबवण्यासाठी लोकप्रतिनिधी अपयशी ठरत आहेत. अशी चर्चा सद्या संपूर्ण तालुक्यात होत आहे.

पाणी योजनेसाठी थंड्याचापाडा येथे 3 फेज लाईनची गरज असल्याने या गावांसाठी येत्या 15 दिवसात नवीन ट्रान्सफर बसवण्यात येईल व होणारी गैरसोय दूर करण्यात येईल.

-अविनाश कटकवार, उपकार्यकारी अभियंता,शहापूर.

थड्याचा पाडा व कोठारे या भागातील दौरा केला. अनेक अडचणी, समस्या समोर आल्या असे असताना लोकप्रतिनिधी एसी ची हवा खाण्यात व्यस्त आहेत. मात्र ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी  विज वितरण व पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याशी सकारात्मक बोलणी झाली असून शिवसेनेच्या माद्यमातून या भागातील पाणी तंचाई चा प्रश सोडवण्यात यश मिळेल.

– पांडुरंग बरोरा, माजी आमदार .

धरणाच्या बेटावर वसलेल्या शहापूर तालुक्यातील असंख्य गाव पाड्यातील ग्रामस्थ फेब्रुवारीनंतर  पाण्यासाठी  वणवन करीत असतात याचे धरणातील पाणी तालुक्यासाठी काही प्रमाणात आरक्षित केले तर टंचाईचे प्रमाण कमी होऊ शकते.

– प्रकाश खोडका, स्थानिक शाम धुमाळ

Back to top button