Video : युवकाला वाचवतानाचा थरार! एक्स्प्रेस समोर त्यानं उडी घेतली पण पोलिस धावला… | पुढारी

Video : युवकाला वाचवतानाचा थरार! एक्स्प्रेस समोर त्यानं उडी घेतली पण पोलिस धावला...

ठाणे; पुढारी ऑनलाईन

ठाणे जिल्ह्यातील विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनवर बुधवारी दुपारी एका युवकाने धावत्या रेल्वे समोर उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण रेल्वे फलाटावर ड्युटीवर असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने आपला जीव धोक्यात घालून त्या युवकाला वाचवले. ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

कुमार पुजारी या तरूणाने भरधाव एक्सप्रेस समोर उडी मारली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या ऋषिकेश माने या रेल्वे पोलिसाने आपला जीव धोक्यात घालून या तरुणाला रेल्वे रुळातून बाजूला केले.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पिवळा शर्ट घातलेला एक युवक रेल्वे येण्यापूर्वी रेल्वे रुळावर उडी मारताना दिसतो. रुळावर पडल्यानंतर तो उठून उभा राहण्याचा प्रयत्न करतो. तो समोरुन एक्स्प्रेस येण्याची वाट पाहतो. हा प्रकार ड्युटीवर असलेल्या रेल्वे पोलीस ऋषिकेश माने यांच्या लक्षात येताच ते वेगाने धावतात. ते रुळावर उभ्या असलेल्या युवकाला धक्का देऊन बाजूला नेतात. त्यानंतर काही सेकंदात एक्स्प्रेस तेथून जाते. फलाटावर तैनात असलेल्या रेल्वे पोलिसाने चपळाईने धावत जाऊन तरुणाचा जीव वाचवला आहे.

मदुराई एक्सप्रेस रेल्वे स्थानकात येण्यापूर्वी ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पहा व्हिडिओ : विठ्ठलवाडी, कल्याण

Back to top button