भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ला; सेना-भाजप शीतयुद्धाचा परिणाम? | पुढारी

भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ला; सेना-भाजप शीतयुद्धाचा परिणाम?

डोंबिवली ; पुढारी वृत्तसेवा : भाजपच्या सोशल मीडिया सेलचे काम पाहणाऱ्या एका कार्यकर्त्यावर सोमवारी (दि.२८) रोजी सकाळी १० वाजता शंकर मंदिराजवळ असणाऱ्या त्याच्या पेट शॉपमध्ये काम करताना दोन अज्ञाताने डोळ्यात मिरची पूड टाकून हल्ला केला. या हल्ल्यात भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे. मनोज कटके असे त्‍याचे नाव आहे. याप्रकरणी  राम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मनोज कटके हा भाजप पक्षाच्या सोशल मीडियाचे काम पाहतो. राज्‍यात महाविकास आघाडीचे सरकार स्‍थापन झाल्‍यानंतर  सेना आणि भाजपमध्ये शीतयुद्ध सुरू झाले आहे. गेल्या आठवड्यात भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी सेनेचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर विविध आरोप केले होते. यावेळी त्यांनी नगर विकास मंत्री आणि पालक मंत्री एकनाथ शिंदे हे झारीतले शुक्राचार्य असल्याचे म्हणत डोंबिवलीचा विकास त्यांनी थांबवला असल्याचा आरोप एका पत्रकार परिषदेत केला होता. त्यामुळे डोंबिवली शहरात राजकीय खळबळ उडाली.

याच दरम्यान हा हल्ला झाल्याने पुन्हा एकदा भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा हल्ला समाज माध्यमावर टाकण्यात येणाऱ्या पोस्टमुळे केला गेला आहे का? असा प्रश्न उपस्थित  केला जात आहे. रामनगर पोलीस ठाण्यात या घटनेचा गुन्हा दाखल झाला आहे. हल्‍लेखाेरांचा कसून शोध घेण्‍यात येत असल्‍याचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी सांगितले.

हेही वाचलंत का? 

Back to top button