मुलुंडमधील ७० लाखांच्या सशस्त्र दरोड्याचा ४८ तासांत उलगडा | पुढारी

मुलुंडमधील ७० लाखांच्या सशस्त्र दरोड्याचा ४८ तासांत उलगडा

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : मुलुंड परिसरातल्या पाच रस्ता येथील व्ही. पी. एंटरप्रायझेसच्या कार्यालयात भरदिवसा पिस्तुलाचा धाकावर दरोडा टाकणाऱ्या ८ जणांच्या टोळीला गजाआड करण्यात आले. आरोपींच्या उजैन, सुरत वाराणसी, ठाणे व मुंबईतून मुसक्या आवळण्यात आल्या. या टोळीतील मास्टरमाईंड हा यूपीचा असून, त्याच्याविरुद्ध खुनाचा व पोलिसांवर फायरिंग केल्याचे गुन्हे दाखल आहेत. या सशस्त्र दरोड्याचा ४८ तासांत उलगडा पोलिसांनी केला आहे.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी ३७ लाख रुपये, ४ पिस्टल, २ कट्टे, २७ काडतूस, तीन कार व वेगवेगळ्या क्रमांकांच्या नंबर प्लेट, गुन्हा करताना बदलेले कपडे पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलीस सहआयुक्त विश्वास नागरे-पाटील यांनी दिली.

२ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे व्ही. पी. एंटरप्रायझेसच्या कार्यालयात कर्मचारी कामात गुतंलेले असताना अचानक ४ जण कार्यालयात शिरले. त्यांनी पिस्तुलांचा धाक दाखवून ७० लाख रुपयांची रोकड पळविली. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ऐन वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या कार्यालयात सशस्त्र दरोडा पडल्याने या गुन्ह्याचा तत्काळ छडा लावण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या. त्यानुसार उपायुक्त प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ ६ व ७ च्या हद्दीतील विशेष पथक नेमण्यात आले. या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला असता दरोडेखोर पळालेल्या कारचा (एमएच/४६-बीक्यू-०२६८) नंबर पोलिसांना प्राप्त झाला.

त्यानुसार पोलिसांनी मनोज गणपत कालं (३२, रा. कर्जत, जि. रायगड), निलेश मंगेश चव्हाण (वय ३४, रा. बदलापूर, जि. ठाणे), निलेश भगवान सुर्वे (वय २३, रा. नवी मुंबई), बिपिन कुमार राजेंद्र प्रसाद सिंग (वय ३४, रा. जोनपूर, उत्तर प्रदेश), रत्नेश उर्फ गं अनिल कुमार सिंग (२५, उत्तर प्रदेश), दिलीप शिवशंकर सिंह (२३, रा. सुरत), वशीउल्ला किताबुल्ला चौधरी (४०, डोंबिवली पूर्व, जि. ठाणे) यांच्या मुसक्या आवळल्या.

सदर कारवाई परिमंडळ ७ चे उपायुक्त प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांतिलाल कोथिंबिरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिलीप धामुणसे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कांबळे, कारंडे, झोमन, पाटील, नाईक, पोउपनि मुलाणी, घोलप, काळे, शिंगटे व परिमंडळचे ६ चे सपोनि कदम, काळे, पोउपनि घुगे, मोरे, यांनी केली.

दरोड्यासाठी महिन्याभरापासून रेकी

या दरोड्यासाठी मास्टमार्इंड विवेक सिंग ऊर्फ मोनू याच्या मार्गदर्शनाखाली महिन्याभरापासून आरोपींनी प्लॅनिंग केली होते. या परिसराची पद्धतशीरपणे रेकी करण्यात आली होती. त्यानुसार सदर दरोडा टाकण्यात आला. मात्र मुंबई पोलिसांनी उत्तमरित्या तपास करून सर्व आरोपींना ४८ तासांमध्ये तुरुंगात पाठविले.

हेही वाचलंत का? 

Back to top button