

सोलापूर : पुणे परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेले उजनी धरण ७०% क्षमतेने भरले आहे. धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे १६ दरवाजे उघडले असून, भीमा नदीच्या पात्रात १६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
गेल्या ३६ दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसामुळे पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. या कालावधीत धरणात तब्बल ४८.८० टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. सध्या दौंड मार्गाने उजनी धरणात ६७ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हा मोठा प्रवाह पाहता, धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
येत्या १० जुलैपर्यंत धरणातील पाणीसाठा ७०% वर स्थिर ठेवला जाईल, यासाठी पाटबंधारे विभाग आणि जिल्हा प्रशासन विशेष काळजी घेत आहे. नदीपात्रात अचानक पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने, प्रशासनाने भीमा नदीच्या काठावर असलेल्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, आपली गुरेढोरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.