मोहोळ : सोलापूर जिल्ह्यासह राज्याला उत्सुकता लागून राहिलेल्या २४७ मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. शरद पवारांनी उमेदवारीबाबत सोलापूर जिल्ह्यासह मोहोळ सिद्धी कदम तालुक्याला धक्का दिला आहे. अनेकांचे लक्ष लागलेल्या मोहोळ अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी दिल्याचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले. मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार यशवंत माने यांना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.
त्यांच्या विरोधात कोण? याकडे सर्वांचे लक्ष होते. मोहोळ येथील भूमिपुत्र म्हणून उमेदवारी मिळेल, अशी आशा नुकतीच भाजपमधून राष्ट्रवादी शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केलेले संजय क्षीरसागर यांना होती; मात्र शरद पवार यांनी ऐनवेळी सिद्धी कदम यांची उमेदवारी जाहीर करून मतदारसंघातील सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. या मतदारसंघात संजय क्षीरसागर, माजी आमदार रमेश कदम, शिवसेनेचे राजू खरे, अभिजीत ढोबळे, गायकवाड अशी नावे चर्चेत होती. यामध्ये कधी राजू खरे, तर कधी संजय क्षीरसागर यांचे नाव फायनल होईल, अशी चर्चा रंगत होती. अखेर रविवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सिद्धी कदम यांच्या नावाची घोषणा करून सर्वांना धक्का दिला.
'तुतारी' हाती घेण्याची संधी मिळावी म्हणून अनेकांनी शरद पवार व जयंत पाटलांना साकडे घातले होते. ही 'तुतारी' माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्येकडे गेली. 'तुतारी' च्या रांगेतील इच्छुक कोणती भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे.