सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण हे अद्यापही ठरलेले नाही. उद्धव ठाकरे शिवसेनेने उमेेदवार जाहीर केल्यानंतर त्यास काँग्रेसचे इच्छुक माजी आ. दिलीप माने यांनी शुक्रवारी (दि. 25) शक्तिप्रदर्शन करत पक्षश्रेष्ठींना इशारा दिला. ते शांत होण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी त्यांना उमेदवारीचे मधाचे बोट दाखवले. त्यानंतर लगेचच दुसर्या दिवशी माने विरोधकांनी ‘सिद्धेश्वर परिवार’चे मुख्य प्रवर्तक धर्मराज काडादी यांच्या निवासस्थानी शक्तिप्रदर्शन करत मानेंच्या विरोधात भूमिका घेतली. एकूणच दक्षिण सोलापूर मतदारसंघातील वाद संपता संपेना, अशी सद्यस्थिती निर्माण झाली आहे.
शनिवारी (दि. 26) काडादी यांच्या गंगा निवासस्थानी झालेल्या बैठकीस काडादी यांनी उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष अर्ज दाखल करावा, या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे, कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके, अशोक निंबर्गी, हरीष पाटील, भीमाशंकर जमादार, गुरुराज म्हेत्रे, संजय गायकवाड, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष भारत जाधव, अॅड. मिलिंद थोबडे उपस्थित होते.
दक्षिण सोलापूर ही जागा ठाकरे शिवसेनेला सुटली आहे. ती जागा काँग्रेसला मिळावी, यासाठी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्याशी बोलणार असल्याची हमी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी दिली. ही जागा काँग्रेसकडे राहावी, यासाठी माजी आ. दिलीप माने नंतर शनिवारी काडादी यांचे समर्थक शक्तिप्रदर्शन करत आहेत. आपला विरोधक भाजप आहे. त्यांना हरविण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याचे आवाहन शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केले. या मतदारसंघातून पक्षाकडून उमेदवारी मिळावे, यासाठी हसापुरे, शेळके, हरीष पाटील, जाफरताज पटेल यांनी पक्षाकडे मागणी केली होती. मात्र, ऐनवेळी काडादी हे इच्छुक झाल्याने त्यांना उमेदवारी द्यावे, अशी शिफारस त्यांनी केली.
मतदारसंघातील द्वेषाचे राजकारण थांबविण्यासाठी आपण निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. खा. शरद पवार यांच्या आग्रहाखातर मी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलो. मात्र, पवार आणि सुशीलकुमार शिंदे हे जो निर्णय घेतील, तो निर्णय मला मान्य राहील, अशी भूमिका काडादी यांनी व्यक्त केली. काँग्रेसवर दबावासाठी ही बैठक नाही. आजपर्यंत झालेल्या घटनांचे खुलासा करण्यासाठी ही बैठक घेतली.