
कुडूवाडी : लऊळ (ता. माढा) येथील बस स्टँडजवळ असणाऱ्या सापटणे रस्त्यावरील शिवराज कलेक्शनमधील विविध कपड्यांच्या गाठींची व नव्याने शिवलेले शर्ट, जीन्स पॅन्ट यासह विविध कपड्यांची सुमारे १३ लाख रुपये किमतीच्या मुद्देमालाची चोरी झाली. यासह अन्य किराणा, कृषी व चप्पल दुकानांतील असे मिळून एकूण १६ लाखांचा ऐवज लंपास झाला. चोरट्यांनी कापड दुकानातील कपड्यांसह तीन सीसीटीव्ही कॅमेरे व आतील एक सेटअप बॉक्स पळवला.
एका किराणा दुकानातील तेलाचे डबे, इतर साहित्य तर रस्त्यावरील चप्पल दुकानातील विविध प्रकारच्या चप्पल्स व कृषी दुकानातील विविध कृषी साहित्यांची एकूण ३ लाख रुपयांची अशा एकूण चार विविध दुकानांचे शटर उचकटून, सुमारे १६ लाख रुपयांच्या मुद्देमालांची चोरी केली. शिवराज कलेक्शनचे मालक दिगंबर कबाडे यांच्या कापड दुकानाची तर बप्पा अजिनाथ गरड यांच्या किराणा दुकानातील आणि वैभव मनोज कदम यांच्या चप्पल व कृषी दुकानातील साहित्यांची चोरी झाली. या चोरीच्या घटना घडल्यानंतर कुडूवाडी पोलिस ठाणे अधिकाऱ्यांसह पथकाने घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला.
शनिवारी घडलेल्या चोरीची तक्रार नोंदणी करण्यासाठी दोन वेळा कापड दुकानदार कबाडे मूळ बिले घेऊन कुडूवाडी पोलिसांत गेले. मात्र पोलिस निरीक्षकांनी निवडणुकीचे कारण देत तक्रार नोंदणीस दोन दिवसांपासून टाळाटाळ केली. सदरील घटनेबाबत मी वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचे कापड दुकानदार कबाडे यांनी सांगितले. याबाबत पो. नि. सुरेश चिलावार यांनी कापड व्यावसायिक कबाडे तक्रार देण्यास आलेच नाहीत, असे सांगितले.