

खुलताबाद: तालुक्यातील वेरूळ येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरीची घटना घडल्याचे समोर आले असून या मध्ये दानपेटी सह पंचधातूच्या मुर्त्यासह चांदीचे छत असा लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.
दरम्यान घटनास्थळी फिंगरप्रिंट पथक व डॉग पथक पाचारण करण्यात आले होते. पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, गुरुवार दिनांक १७ ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास ही चोरीची घडली असून या घटनेमध्ये पार्श्वनाथ भगवान यांच्या विविध भावमुद्रेतील सात पितळी मुर्त्या व दहा किलोचे चांदीचे छत हे चोरट्यांनी चोरून नेले असल्याची माहिती पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष दिनेश गंगवाल यांनी दिली.
चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी विजयकुमार ठाकूरवाडी, खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, पोलीस उपनिरीक्षक बनसोडे यांच्यासह फिंगरप्रिंट पथक व डॉग पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपास सुरू केला आहे.