पूर्णा : तालूक्यातील चुडावा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरण येथे शुक्रवारी (दि.२५) रात्री घरात कोणी नसल्याचा फायदा उचलत सोने चांदी दागिन्याचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाट उघडून त्यातील २५ हजार रुपये आणि सोने चांदी दागिन्याचा ऐवज काढून घेत पोबारा केला.
या बाबत अधिक माहिती असी की, पूर्णा तालूक्यातील पिंपरण येथील फिर्यादी लताबाई राजकुमार सोनटक्के (वय ३५ वर्ष) ह्या घराचे कुलूप लावून नातेवाईकांकडे गेल्या होत्या. घरी कोणी नसल्याचा फायदा उचलून अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत लोखंडी कपाटाचा कूलूप काढून त्या मधील २५ हजार रुपये आणि सोन्या चांदीचे दागिने असा मिळून ८२ हजार रुपयाचा ऐवज घेवून पोबारा केला.
सदर घटनेबाबत लताबाई राजकुमार सोनटक्के यांच्या फिर्यादीवरून चुडावा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक नरसिंग पोमनाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जाधव, थोरे पुढील तपास करीत आहेत.