

Solapur Tulsi Village Water Crisis: ‘आमचं गाव विक्रीसाठी आहे, कोणी तरी विकत घ्या’... सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी गावात लावण्यात आलेल्या या बॅनरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेल्या पाणीप्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी हा अनोखा मार्ग अवलंबला आहे.
तुळशी गावातील ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून सीना-माढा उपसा जलसिंचन योजनेचे पाणी गावाला मिळावे, अशी मागणी करत आहेत. मात्र, अद्याप त्यांच्या मागणीची दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आता थेट ‘गाव विक्रीसाठी’ असल्याचा बॅनर लावून प्रशासनाचा निषेध केला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, उजनी धरणातून २००० साली सीना-माढा उपसा जलसिंचन योजना सुरू करण्यात आली. मात्र, या योजनेत सुरुवातीपासूनच तुळशी गावाचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून गावाला या योजनेच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने गावातील पाणीटंचाई आणखी गंभीर झाली आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीसाठीही पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या पिकांवर होत आहे.
गावाला सीना-माढा योजनेचे पाणी मिळाले, तर पाण्याचा हा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो, अशी ग्रामस्थांची भूमिका आहे.
पाण्याच्या मागणीसाठी उजनी पाणी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली १४ ऑक्टोबरपासून तुळशी गावात १२ शेतकऱ्यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला पाच दिवस उलटूनही प्रशासनाकडून प्रश्न सोडवण्यासाठी ठोस पावले उचलली गेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. त्यानंतर गावात ‘आमचं गाव विक्रीसाठी आहे, कोणी तरी विकत घ्या’ असा बॅनर लावण्यात आला.
ग्रामस्थांनी या बॅनरच्या माध्यमातून प्रशासनावर उपरोधिक टीका केली आहे. ‘टाटा-बिर्ला, अंबानी या आणि गाव विकत घ्या, आम्हाला पाणी द्या’, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
पाण्याचा प्रश्न केवळ शेतीपुरता मर्यादित नसल्याचेही ग्रामस्थ सांगतात. पाणी उपलब्ध नसल्यामुळे गावातील दैनंदिन जीवनावरही त्याचा परिणाम होत आहे. पाण्याची सुविधा नसल्याने तरुण-तरुणींच्या विवाहासाठीही अडचणी निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करूनही प्रश्न सुटत नसल्याने अखेर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी हा अनोखा मार्ग स्वीकारला आहे.
आता सिना-माढा उपसा जलसिंचन योजनेचे पाणी तुळशी गावापर्यंत कधी पोहोचणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. ‘गाव विक्रीसाठी’चा बॅनर आणि सुरू असलेले आमरण उपोषण यामुळे प्रशासन या प्रश्नावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.