

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने निकालाला उशीर होण्याच्या जुन्या तक्रारींवर वर्षभरात निर्णायक मात केली आहे. मध्यंतरी विद्यार्थ्यांकडून वारंवार येणाऱ्या निकालाच्या तक्रारींची प्रथा मोडून काढत ऑक्टोबर-नोव्हेंबर सत्र परीक्षांमध्ये विद्यापीठाने एकूण 405 अभ्यासक्रमांपैकी 230 अभ्यासक्रमांचे निकाल जलद गतीने जाहीर केले आहेत.
निकाल देण्यासाठी 45 दिवसांचा कालावधी मिळतो. मात्र, विद्यापीठाने या नियमाचे बंधन न बाळगता तत्परतेने काम केले. तातडीने पेपर तपासणी प्रक्रिया पूर्ण करून, वेळेच्या आधीच परीक्षा विभागाचे निकाल जाहीर केले. कुलगुरू प्रा.डॉ. प्रकाश महानवर आणि प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे हे शक्य झाले आहे. या जलद निकालांमुळे हजारो विद्यार्थ्यांचा पुढील उच्च शिक्षणाचा मार्ग, तसेच विविध नोकरीच्या संधींचा मार्ग तत्काळ मोकळा झाला आहे.
पीएच.डी. 2 दिवसात निकाल
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने आपल्या गतिमान प्रशासनाचा उत्कृष्ट नमुना सादर केला आहे. दि.24 ते 28 नोव्हेंबर दरम्यान पार पडलेल्या विद्यावाचस्पती (पीएच.डी.) कोर्सवर्क परीक्षेचा निकाल विद्यापीठ प्रशासनाने केवळ दोनच दिवसांत जाहीर करून चांगली कामगिरी केली आहे.