

सांगोला : नगरपालिका निवडणुकीचा निकाल अजून जाहीर होतो ना होतो, तोपर्यंतच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. एवढ्यात सांगोला तालुक्यातील 66 ग्रामपंचायतच्या निवडणुका फेब्रुवारीअखेरपर्यंत उरकून घेण्याचे आदेश आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीबरोबर आता ग्रामपंचायतच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. यामुळे गावपुढाऱ्यांनाही आता कामाला लागावे लागणार आहे.
दोन दिवसात सांगोला नगरपालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. यामध्ये 1 लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्यासाठी मतदान झाले आहे. पैकी अद्यापही 2 प्रभागासाठी मतदान होणे बाकी आहे.
त्यानंतर 21 डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. हा निकाल जाहीर होतो ना होतो तोपर्यंतच, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारखांकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. मध्यंतरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका नगरपालिकेच्या अगोदर होणार की नंतर? याबाबत मोठी उत्सुकता होती. परंतु, आयोगाच्या निर्णयानुसार नगरपालिका निवडणुका पूर्ण अगोदर होत आहेत. यानंतर लगेचच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार आहे.
सांगोला तालुक्यातील सोनलवाडी, बागलवाडी, राजापूर, सोनंद, गळवेवाडी अशा एकूण 5 ग्रामपंचायतीवर यापूर्वीपासूनच प्रशासक यांची नेमणूक केली आहे. त्यानंतर येत्या 2 महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 2026 मध्ये तालुक्यातील 61 ग्रामपंचायतच्या मुदती संपणार आहेत. एकंदरीत 66 ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यासाठी कोणत्याही एकाक्षणी आयोगाकडून सूचना येण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीबरोबर आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आता गावपुढाऱ्यांनाही पुढे यावे लागणार आहे. यासाठी आयोगाकडून लवकरच आचारसंहिता जाहीर होईल, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.