सोलापूर ः विजय थोरात
सोलापूरकरांना एक आनंदाची बातमी रेल्वे प्रशासनाने दिली आहे. आगामी दसरा, दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशांची अतिरिक्त होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने सोलापूर विभागातून धावणार्या सोलापूर-मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस-सोलापूर एक्स्प्रेस, सोलापूर-तिरुपती-सोलापूर, सोलापूर-दौंड-सोलापूर, सोलापूर-कलबुर्गी (गुलबर्गा)-सोलापूर आणि पुणे-हरंगुळ (लातूर)-पुणे या पाच विशेष रेल्वे गाड्यांना डिसेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे सोलापूरकरांना दसरा, दिवाळीत सुट्टीचा आनंद घेता येणार आहे.
दरम्यान, सोलापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस ही साप्ताहिक गाडी 29 सप्टेंबरला धावणार होती. आता एक ऑक्टोबर ते 31 डिसेंबरपर्यंत धावणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-सोलापूर ही 25 सप्टेंबरपर्यंत धावणार होती. आता दोन ऑक्टोबर ते एक जानेवारी 2025 पर्यंत धावणार आहे. तसेच सोलापूर-तिरुपती साप्ताहिक एक्स्प्रेस ही 26 सप्टेंबरपर्यंत धावणार होती,आता तीन ऑक्टोबर ते 26 डिसेंबरपर्यंत धावणार आहे. तिरुपती-सोलापूर ही 27 सप्टेंबरपर्यंत होती. आता चार ऑक्टोबर ते 27 डिसेंबरपर्यंत धावणार आहे. सोलापूर-दौंड-सोलापूर डेमू ही 30 सप्टेंबरपर्यंत होती. आता एक ऑक्टोबर ते 31 डिसेंबरपर्यंत धावणार आहे. सोलापूर-कलबुर्गी-सोलापूर डेमू ही 30 सप्टेंबरपर्यंत होती आता एक ऑक्टोबर ते 31 डिसेंबरपर्यंत धावणार आहे. तर पुणे-हरंगुळ(लातूर)-पुणे ही नियमित धावणारी एक्स्प्रेस 30 सप्टेंबर पर्यंत होती. आता ही गाडी एक ऑक्टोबर ते 31 डिसेंबर पर्यंत धावणार आहे.
सोलापूर-तिरुपती-सोलापूर साप्ताहिक, पुणे-हरंगुळ विशेष एक्स्प्रेस व सोलापूर-लोकमान्य टिळक-सोलापूर साप्ताहिक विशेष या तिन्ही तसेच इतर डेमू रेल्वेगाड्यांना विशेष दर्जा असल्यामुळे या रेल्वेगाड्यांचे तिकीट दर इतर रेल्वेपेक्षा अधिक आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक आर्थिंक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे या रेल्वेचा विशेष दर्जा काढून नियमित क्रमांक देण्याची मागणी रेल्वे प्रवासी अन् संघटनांमधून होत आहे.