पोखरापूर : मोहोळ तालुक्यातील इंचगाव येथे कुऱ्हाडीचे घाव घालून ४५ वर्षीय तरूणाचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी (दि.२०) दुपारी २ च्या सुमारास इंचगाव येथील बंदेनवाज दर्ग्याजवळ घडली.दत्तात्रय वामन वराडे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी विजय नागनाथ घुले याच्यावर कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, इंचगाव (ता. मोहोळ) येथील दत्तात्रय वराडे हे शुक्रवारी दुपारी गावातील बंदेनवाज दर्गा परिसरातील चिंचेच्या झाडाखाली बसले होते. यावेळी त्यांच्यासोबत अशोक रावसाहेब वराडे, शहाजी मुटकुळे, संजय अंबादास डोके, पोपट शामराव पाटील, दत्तात्रय भागवत वराडे, शशीकांत मधुकर घोडके, कैलास शिवाजी डोके, शंकर शेंडगे ही गावातील मंडळी गप्पा मारत बसली होती. यावेळी विजय घुले हा त्या ठिकाणी आला. व त्याने सोबत आणलेल्या कुऱ्हाडीने दत्तात्रय वराडे यांच्यावर वार केले. त्यानंतर तेथील उपस्थितांनी दत्तात्रय यांच्या भावाला याबद्दल माहिती दिली. त्यानंतर भाऊ नागनाथ वराडे यांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या दत्तात्रय यांना रुग्णवाहिकेतून कामती प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी नागनाथ वराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय घुले याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार करत आहेत.