सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत वसुंधरा संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनावरून वाद निर्माण झाला आहे. स्थानिक पर्यावरणीय समस्यांना बगल देणारे संमेलन असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींचा आहे. गेल्या 50 वर्षांच्या काळात शहराती पर्यावरणाचा प्रचंड र्हास झालेला आहे. यंदा शहराचे तापमान 45 अंश सेल्सिअसच्या जवळपास गेले होते. गेली काही वर्षे तापमानाचा पारा 44 अंश सेल्सिअस पार करतो आहे. 1988 मध्ये तर उन्हाने 46 अंश सेल्सिअस इतकी उच्चांकी पातळी गाठलेली होती. याला कारणीभुत म्हणजे शहरातील घटत चाललेले पर्यावरण हरित क्षेत्र. शहराची लोकसंख्या 12 लाखांच्या असपास आहे. त्या प्रमाणात झाडांची संख्या नाही.
शहरातील उन्हाळ्यातील हवामानात हवेतील आर्द्रता नाममात्र असते. त्यामुळे धुळीचे प्रमाण भयंकर वाढुन श्वसनाचे विकार वाढत आहेत. शुष्क,कोरड्या आणि उष्ण हवेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा वातावरणात महापालिकेच्या वतीने शहराच्या पर्यावरणीय समस्यांना बगल देऊन सर्प आणि जल असे दोन विषयावर वसुंधरा संमेलन घेतले आहे.
पर्यावरणीय गरज लक्षात घेता दोन विषयाला महत्त्व देत स्थानिक पर्यावरणीय विषयांना बगल देत शहरवासियांची चेष्टा केली आहे. सहभागी पर्यावरणीय संस्थांना नाममात्र मानाचे पान देऊन तोंडाला पाने पुसली आहेत. शहरातील पर्यावरण प्रेमी आणि पर्यावरण विषयक काम करणार्या संस्थांना संमेलन संपण्यापूर्वी नाममात्र वेळ देऊन त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.