

सोलापूर : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सोमवारी ६ ऑक्टोबर व मंगळवार ७ ऑक्टोबरला तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होणार आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा व इतर राज्यांतून भाविक तुळजापूरला येतात. या काळात अनेक भाविक सोलापूरहून पायी चालत तुळजापूरकडे जातात. त्यामुळे सोलापूर–तुळजापूर मार्गावर गर्दी व अपघाताची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.
सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी यासंदर्भातील आदेश जाहीर केला असून शनिवारी ४ ऑक्टोबर पहाटे १२.०१ वाजल्यापासून ते मंगळवार ७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत सोलापूर शहरातील जुना तुळजापूर नाका ते तुळजापूर शहर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
- पुणे महामार्गाकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहने : सोलापूर (बाळे गाव) – बार्शी – येरमाळा मार्गे.
-पुणे महामार्गाकडून धाराशिवकडे जाणारी वाहने : सोलापूर (बाळे गाव) – बार्शी – वैराग मार्गे.
-पुणे महामार्गाकडून लातूरकडे जाणारी वाहने : सोलापूर (बाळे गाव) – बार्शी – येडशी – ढोकी – मुरुड मार्गे.
-सोलापूर/पुणे महामार्गाकडून तुळजापूरकडे जाणारी वाहने : हैदराबाद महामार्गावरील सोलापूर (मार्केट यार्ड) – बोरामणी – इटकळ – मंगरूळ पाटी मार्गे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तथापि, पोलीस वाहने, रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवा व पोलिसांनी परवानगी दिलेली वाहने यांना सूट राहील. सुरक्षिततेसाठी, गर्दी नियंत्रणासाठी व भाविकांच्या सोयीसाठी ही वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी व नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी केले आहे.