

Tuljapur temple navratri festival security ai camera news
धाराशिव : तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रौत्सवात दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ती सुरळीतपणे नियंत्रित करण्यासाठी यंदा पोलिसांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीचा आधार घेतला आहे. दर्शन व्यवस्था अधिक सुटसुटीत व्हावी यासाठी सहा एआय-कॅमेरे (AI-camera) मंदिर परिसरात बसवण्यात आले आहेत.
रविवारी (दि. २१) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी ही माहिती दिली. पोलीस अधीक्षक खोखर म्हणाल्या की, नवरात्र उत्सवासाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन पोलीस अधीक्षक, १२ उपअधीक्षक, १०० पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक निरीक्षक तसेच अडीच हजार पोलिसांचा ताफा तीन सत्रांत कार्यरत असणार आहे.
गर्दीचे नियंत्रण व भाविकांची मोजणी करण्यासाठी सहा ठिकाणी एआय-कॅमेरे बसवले असून, यामुळे कोणत्या भागात गर्दी वाढली आहे हे त्वरित लक्षात येणार आहे. तसेच एखादी व्यक्ती हरवल्यास तिचा फोटो या प्रणालीमध्ये टाकल्यास ती व्यक्ती शेवटची कुठे दिसली होती याचा मागोवा घेता येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
याशिवाय तुळजापूर शहरात वाहतूक व गर्दी नियंत्रणासाठी तब्बल ६०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence) साहाय्याने यंदा नवरात्र उत्सवात भाविकांना सुरक्षित, सुरळीत व व्यवस्थित दर्शन मिळावे, यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही जिल्हाधिकारी पुजार यांनी स्पष्ट केले.