

तुळजापूर : संबळ वादनाचा गगनभेदी निनाद आणि तेजस्वी कुंकवाची उगवत्या सूर्याबरोबर उधळण, अशा रोमांचकारी वातावरणामध्ये तुळजाभवानी देवीचे ऐतिहासिक सीमोल्लंघन गुरूवारी (दि.२) पार पडले. यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती.
मध्यरात्री एकपासून गाभाऱ्यामध्ये देवीच्या शिलंगण सोहळ्याची तयारी तुळजाभवानी देवीचे भोपे, पुजारी करीत होते. पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, मंदिराचे धार्मिक व्यवस्थापक, पुजारी सचिन परमेश्वर, बुबासाहेब पाटील, बाजार समितीचे माजी सभापती सचिन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष धीरज पाटील, शशिकांत परमेश्वर, शशिकांत पाटील, यांच्यासह इतर पुजाऱ्यांनी या काळात पूर्वतयारी केली. त्यानंतर भिंगार येथून आलेली पलंग पालखी पहाटे चारच्या सुमारास तुळजाभवानी मंदिरात दाखल झाली. कुंकवाची उधळण करत भाविक भक्तांनी पलंग पालखीचे दर्शन घेतले. त्यानंतर परंपरागत धार्मिक विधी पूर्ण करून तुळजाभवानी देवीची मुख्यमूर्ती भिंगारच्या पालखीमध्ये बसविण्यात आली.
दरम्यान चांदीच्या सिंहासनावर देवीच्या मूर्तीला १०८ साड्यांचे दिंड गुंडाळण्यात आले. भोपे पुजारी बांधवांनी ही देवीची मूर्ती परंपरागत पद्धतीने पालखीमध्ये बसविली आणि त्यानंतर मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली. जोशपूर्ण आणि रोमांचकारी या ‘शिलंगण’ कार्यक्रमांमध्ये स्थानिक गोंधळी बांधवांनी संबळाचा निनाद केला. त्यानंतर भाविकांनी फुले आणि लाल रंगाच्या कुंकवांनी पालखीवर वर्षाव केला. अखेरीस भिंगार येथून आलेले आणि तुळजापूर येथे सेवा देणारे सर्व मानकरी सेवेकरी यांचा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व आ. राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते मानाचा आहेर करून सत्कार करण्यात आला.
श्री क्षेत्र तुळजापूर येथे सुरू असलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने गुरुवारी पहाटे पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात पार पडला. उगवत्या सूर्याच्या पहिल्या किरणात, कूंकवाच्या मुक्त उधळणीत आणि “आई राजा उदो-उदो” च्या जल्लोषात तुळजाभवानी देवींचा हा सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.
मंदिरातील या धार्मिक सोहळ्यास मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार, आ. तथा विश्वस्त राणाजगजितसिंह पाटील, पोलीस अधीक्षक रितू खोकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, सौमय्याश्री पुजार, तहसीलदार अरविंद बोळंगे, तहसीलदार सौ. माया माने, महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो व मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.